नवी मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला गतिमानता
महापालिका क्षेत्रातील ५४० स्थानांवर ‘सीसीटिव्ही'द्वारे वॉच
नवी मुंबई ः नवी मुंबई शहर सुरक्षेचे सक्षमीकरण करणाऱ्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या कार्यवाहीवर बारकाईने लक्ष दिले आहे. विविध स्वरुपाचे १५०० हुन अधिक सीसीटीव्ही कॅमेरे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी बसविण्यात येत असून आत्तापर्यंत ४८४ कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यामधील १९ कॅमेरे प्रायोगिक स्वरुपात कार्यान्वित करण्यात आले असून त्याची तपासणी सुरु आहे. सदर सीसीटिव्ही बसविण्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी शहर अभियंता संजय देसाई तसेच अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत केली. तसेच काम गतीमानतेने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
सदर प्रकल्पांतर्गत महापालिका क्षेत्रातील ५४० स्थानांवर प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून शहरातील मुख्य चौक, बस डेपो, मार्केटस्, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे, महापालिका कार्यालये, पामबीच, ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल असे जास्त रहदारीचे रस्ते येथे हाय डेफिनेश कॅमेरे बसविण्यात येत आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये ९५४ फिक्स्ड कॅमेरे तसेच ३६० अंशामध्ये गोलाकार चित्रण टिपणारे १६५ पीटीझेड कॅमेरे बसविण्यात येत आहेत. याशिवाय महापालिका क्षेत्राला लाभलेला विस्तारित सागरी किनारा लक्षात घेऊन सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ९ थर्मल कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
याशिवाय पोलीस विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे ९६ इव्हिडन्स कॅमेरे २४ मुख्य ट्रॅफिक जंक्शनवर बसविण्यात येत असून २८८ एएनपीआर म्हणजेच ॲटोमॅटीक नंबर प्लेट रेक्गनेशन कॅमेरे देखील बसविण्यात येत आहेत. या एएनपीआर कॅमेऱ्यांद्वारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार आहे. सदर यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर सिग्नल तोडणाऱ्या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह पाठविले जाणार आहे.
यासोबतच २४ ट्रॅफिक जंक्शनवर पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम बसविण्यात येत असून याद्वारे आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक क्षणी नागरिकांकरिता सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून महत्वाच्या सूचना देणे शक्य होणार आहे. या सीसीटीव्ही प्रणालीच्या मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्ष (घ्हूाुीीूा् ण्दस्स्ीह् ीह् ण्दहूीदत् णहूीा) उभारणीचे काम महापालिका मुख्यालय येथे सुरु असून सदर नियंत्रण कक्ष नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथील विशेष कक्षाशी जोडलेला असणार आहे. अशाच प्रकारचा निरीक्षण कक्ष वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालय तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ यांच्या कार्यालयातही असणार आहे.
या सर्व सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाची नियंत्रण कक्षातील संग्रहण क्षमता ३० दिवसांची असणार असून या प्रणालीमध्ये महत्वाच्या प्रसंग, घटना यांचे सीसीटिव्ही चित्रीकरण स्वतंत्रपणे संग्रहण करुन ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे.