वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या समस्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश
कळंबोली सर्कल येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पुढाकार
नवी मुंबई ः मुंबई-पुणे मार्गावरील महत्वाचे जंक्शन असलेल्या कळंबोली सर्कलवर कायम वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे येथील वाहतूक कोंडीत विनाकारण हजारो वाहने अडकून पडत असतात. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांची देखील नेहमीच दमछाक होत असते. त्यामुळे कळंबोली सर्कल येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने पुढाकार घेतला आहे. तसेच त्याठिकाणी उपायोजना करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कळंबोली सर्कल येथे विविध प्रशासकीय यंत्रणांची बैठक पार पडली. यावेळी उपस्थित विविध प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी कळंबोली सर्कलवर उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करुन त्याबाबत कार्यवाही करण्याबाबत सकारात्मकता दाखविली. त्यामुळे येत्या काळात कळंबोली सर्कलवरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील महत्वाचे जंक्शन असलेल्या कळंबोली सर्कल वरुन मुंबई, पनवेल, पुणे, जेएनपीटी, मुंब्रा, ठाणे अशा विविध मार्गावरील जड-अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे कळंबोली सर्कलवरुन एका दिवसाला सुमारे ४ हजार ते ४५०० वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे कळंबोली सर्कलवर नेहमीच वाहनांची प्रचंड वर्दळ असल्यामुळे या सर्कलवर अपघातांच्या घटना देखील नेहमीच घडत असतात. जड-अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे कळंबोली सर्कलवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. यात मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडतात. कळंबोली सर्कल येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसाची नेहमीच तारांबळ उडत असते. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यासाठी कळंबोली सर्कलवर कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. याचा नुकताच पोलीस उपायुवत काकडे यांनी आढावा घ्ोतला. त्यानंतर त्यांनी नवी मुंबई वाहतूक पोलिसांसह, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, आयआरबी, सिडको, आरटीओ, पनवेल महापालिका तसेच इतर प्रशासकीय यंत्रणाच्या अधिकाऱ्यांचा स्थळ पाहणी दौरा आयोजित केला. यावेळी झालेल्या बैठकीत कळंबोली सर्कल येथील वाहतूक सुरळीत व्हावी. तसेच वाहतूक कोंडीमूळे उद्भवणारे अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अनावश्यक बाह्यमार्ग, सिग्नलचे आधुनिकीकरण, तांत्रिक अडचणी दूर करणे, साईड पट्ट्या भरणे, खड्डे भरणे या महत्वांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच त्याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. येत्या काळात सदर सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकारीवर्गाने पावले उचलण्याबाबत चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीस पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ'चे कैलास पाटील, संदीप यादव, ‘सिडको'चे अभियंता हर्षल कोळी, ‘पीडब्ल्युडी'चे कल्याणी गुप्ता, उपविभागीय अभियंता विजय पाझारे, सत्यम सेठ, पनवेल महापालिकेचे अभियंता पी.आर.दोडे, कनिष्ठ अभियंता महेश वाघमारे, ‘आयआरबी'चे सचिन देवरे, प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी गजानन ठोंबरे, कळंबोली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार तसेच खारघर टोल नाका प्रशासनाचे प्रतिनिधी, आदि उपस्थित होते.