उद्यानांच्या देखभाल-दुरुस्ती होण्यासाठी दशरथ भगत यांचा जनआंदोलनाचा इशारा

मुर्च्छीत अवस्थेतील उद्यानांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील विविध नोडस्‌ मधील अनेक उद्याने आणि मैदाने यांची गेल्या अनेक महिन्यांपासून अंतर्गत देखभाल-दुरुस्ती तसेच वृक्षांची आणि हिरवळीची अक्षरशः दैना झालेली पहायला मिळते आहे. ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'च्या वतीने अध्यक्ष तथा महापालिकाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली येत्या ७ फेब्रुवारी २०२३ रोजी नवी मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर उद्यान विभागाच्या बेदखल आणि ठप्प असलेल्या कारभाराविरुध्द निष्क्रिय प्रशासन अनुषंगाने निषेध आंदोलन घेण्यात येणार आहे. तसा पत्रव्यवहार ३० जानेवारी रोजी महापालिका आणि पोलीस प्रशासनास करण्यात आला होता.

मात्र, २ फेब्रुवारी रोजी महापालिका उद्यान विभागाच्या उपायुक्तांनी नियोजित आंदोलन मागे घेण्याबाबत लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार त्यांच्या विनंतीपत्राचा सन्मान ठेऊन तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे. दरम्यान, पामबीच-सानपाडा मधील प्रभाग क्र. ६५, ७७ आणि ७८ या तिन्ही प्रभागांसह शहरातील सर्वच उद्याने, मैदाने, रस्ता दुभाजक, ट्री बेल्ट तसेच उद्याने आणि मैदानातील ओपन जिमचे साहित्य, खेळणी, बेंचेस यासह अन्य अभियांत्रिकी कामे निगा न राखल्याने नागरिकांमध्ये महापालिका विरोधात रोष व्यक्त होत आहे. यासंदर्भात तसेच शहरात ठिकठिकाणी नागरिकांसाठी बसवलेल्या ओपन जिमच्या साहित्याच्या देखभाल-दुरुस्ती बाबत उचित कार्यप्रणाली ठरवून त्याची अंमलबजावणी कशी करणार यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या समवेत पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या साक्षीने ७ फेब्रुवारी पर्यंत बैठकीचे आयोजन संबंधित विभाग प्रमुखांनी करावे. अन्यथा २१ फेब्रुवारी २०२३ रोजी महापालिका मुख्यालयावर तीव्र जनआंदोलन करुन प्रशासनाचा तीव्र निषेध केला जाईल, असा इशारा पामबीच सोनखार विभागाच्या माजी नगरसेविका सौ. वैजयंती दशरथ भगत यांनी शिष्टमंडळासह महापालिका उपायुक्त नितीन नार्वेकर यांना दिले आहे.

दरम्यान, यासंदर्भात लवकरच महापालिका आयुवतांची वेळ घेऊन संयुक्त बैठकीचे आश्वासन उपायुक्त नितीन नार्वेकर यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची दशरथ भगत यांची मागणी