उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची दशरथ भगत यांची मागणी
शहरातील उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष ?
नवी मुंबई ः नवी मुंबई शहरातील उद्याने ओसाड करुन त्याप्रती नागरिकांच्या भावना भडकविणाऱ्या महापालिकेच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा या मागणीसाठी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी शिष्टमंडळासह ‘एनआरआय पोलीस स्टेशन'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांची भेट घेतली. नवी मुंबई शहरातील विविध नोडस् मधील अनेक उद्याने आणि मैदाने यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अंतर्गत देखभाल-दुरुस्ती आणि वृक्षांची तसेच मैदाने, रोड डीवायडर, ट्री बेल्ट तसेच उद्याने, मैदानातील ओपन जिमचे साहित्य, खेळणी, बेंचेस ठिकठिकाणी नागरिकांसाठी बसवलेल्या ओपन जिमच्या साहित्याची देखभाल-दुरुस्ती अन्य अभियांत्रिकी कामे न केल्याने, महत्वाचे म्हणजे आवश्यक ती निगा न राखल्याने नागरिकांमध्ये महापालिकेच्या विरोधात भावना अधिकच तीव्र झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने ६ फेब्रुवारी रोजी एनआरआय पोलीस ठाणे येथे दशरथ भगत यांनी माजी नगरसेविका सौ. वैजयंती भगत आणि प्रभागातील नागरिक यांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती लक्षात आणून देऊन त्यावर सविस्तरपणे चर्चा केली.
महापालिका प्रशासन निरंकुश वृत्तीने काम करीत असून जनतेच्या कर रुपाने जमा झालेल्या पैशांची लयलूट करीत आहेत. शहराला ओसाड करुन जर महापालिकेच्या तिजोरीची लूट प्रशासन करीत आहेच; परंतु नागरिकांना सुख-सुविधांपासून वंचित देखील ठेवत आहे. त्यामुळे नागरिकांमधील भावनांचा प्रतिदिन उद्रेक होत आहे. आता नागरिक महापालिका प्रशासन विरोधात रस्त्यावर उतरुन जनआंदोलन छेडण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. या प्रकरणी कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचे काम महापालिकेचे प्रशासन करीत आहे. म्हणून पोलीस विभागाने अधिक सजग राहून कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्या महापालिका प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावावी, अशी मागणी दशरथ भगत यांनी यावेळी निवेदनातून केली. यासंदर्भात उचित कार्यप्रणाली ठरवून त्याची अंमलबजावणी करावी यासाठी महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्षभरापासून सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे. तरी देखील प्रशासनाने याबाबीकडे दुर्लक्ष करतानाच याउलट उद्यान विभागाने शहरातील उद्याने आणि विविध ठिकाणे ओसाड करणाऱ्या ठेकेदाराला काम न करताच लाखोंची बिले अदा केलेली आहेत. याबाबत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी महापालिका मुख्यालयाबाहेर जनआंदोलन करुन निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांनी २ फेब्रुवारी रोजी लेखी पत्राद्वारे आंदोलन न करण्याची विनंती केली आहे. तर ३ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष भेटून माजी नगरसेविका सौ. वैजयंती भगत यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाला उपायुवत नार्वेकर यांनी लवकरच आयुक्त राजेश नार्वेकर यांची वेळ घेऊन पोलीस अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याचे वचन दिलेले आहे. तरीही अशा प्रकारे संयुक्त बैठकीचे आयोजन न केल्यास अथवा शहरातील उद्याने आणि अन्य बाबाबींकडे सुधारणा विषयक वेळीच अंमलबजावणी न झाल्यास येत्या २१ फेब्रुवारी रोजी महापालिका मुख्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाला पोलिसांनी योग्य प्रकारे सहकार्य करावे, अशी विनंती दशरथ भगत यांनी ‘एनआरआय'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांना यावेळी केली.