आग नागरी वस्तीपासून दूर लागल्याने मोठी हानी टळली
तुर्भे क्षेपणभुमीला भीषण आग
वाशी ः नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे क्षेपणभूमी परिसरात भीषण आग लागल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. परंतु, सदर आग नागरी वस्तीपासून दूर लागल्याने मोठी हानी टळली. तुर्भे स्टोअर मागे नवी मुंबई महापालिकेची क्षेपणभूमी आहे. या ठिकाणी नवी मुंबई शहरातील कचरा गोळा केला जातो. एकूण सात सेल मध्ये सदर क्षेपणभूमी आहे. कचऱ्या सोबतच या ठिकाणी हरित टाकावू कचरा (ग्रीन वेस्टेज) देखील जमा केला जातो. याच हरित टाकावू कचऱ्याला (ग्रीन वेस्टेज) ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची घटना समजताच एमआयडीसी अणि महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, सदर आग दोन ते अडीच एकर परिसरात फैलावल्याने दुसऱ्या दिवसा पर्यंत सदर आग धुमसत होती. सदर आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही, अशी माहिती वाशी अग्निशमन केंद्राचे प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली. मात्र, क्षेपणभूमी परिसरात वाढत्या अनधिकृत भंगार माफियांकडून सदर आग लावली गेली असल्याचा संशय यावेळी स्थानिकांनी वर्तविला.