अतिक्रमित जागा संरक्षित केल्यास अवैध बांधकामांना चाप

दिखाव्याच्या कारवाईने वेळ, पैसा दोन्ही वाया ?

वाशी ः नवी मुंबई शहरात वाढत्या अनधिकृत बांधकामांवर सिडको आणि नवी मुंबई महापालिका मार्फत तोडक कारवाई करण्यात येते. मात्र, यातील बहुतांश ठिकाणी कारवाईचा फक्त फार्स दाखवला जात असून, दिखाव्याच्या कारवाया केल्या जात आहेत. परंतु, तोडक कारवाई केलेल्या अतिक्रमणाच्या जागी पुन्हा बांधकाम सुरु होत असल्याने तोडक कारवाईत महापालिकेचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत आहे. त्यामुळे कारवाई केलेली जागा महापालिका किंवा सिडको प्रशासनाने सिल करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नवीन शहर वसवण्यासाठी ‘सिडको'ने नवी मुंबईतील जमीन संपादित केली आहे. त्यामुळे येथील जमीन मालक म्हणून आज सिडको दाखवत आहे. तर नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिका आहे. मात्र, आजघडीला नवी मुंबई शहरात महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेसुमार अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या अनधिकृत बांधकामांवर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, न्यायालयात कागदी घोडे नाचवण्यासाठी महापालिका आणि सिडको मार्फत अनधिवृÀत बांधकामांवर तोडक कारवाईचा दिखावा केला जात असल्याचे तोडक कारवाई नंतर दुसऱ्या दिवशी उघड होत आहे.नुकतीच तुर्भे विभागात मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण विभागामार्फत तोडक कारवाई करण्यात आली. मात्र, अनधिकृत बांधकामात आधीच हात ओले केल्याने सदर बांधकामाची फक्त एक पायरी तोडण्याचे सौजन्य पार पाडण्यात आले. तर हिच अवस्था इतर विभागात देखील आहे. त्यामुळे महापालिका आणि सिडको प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर सरसकट कारवाई करुन ती जागा ‘सिडको'ने आपल्या ताब्यात घेतल्यास पुढे अनधिकृत बांधकामांना चाप बसेल आणि अतिक्रमित भूखंड भविष्यात नागरी सुविधांसाठी वापरात आणता येऊ शकतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तोडक कारवाई नंतर अतिक्रमणे सिल करुन ती जागा ताब्यात घ्यावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

नवी मुंबई महापालिका आणि सिडको मार्फत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना ती फक्त दिखाव्यासाठी केली जाते का?. कारण तोडक कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी सदर बांधकामे पुन्हा सुरु झालेली असतात. त्यामुळे कारवाई करताच अतिक्रमित जागेवर दुबार बांधकाम होणार नाही, यासाठी सदर जागा सिडको आणि महापालिका प्रशासनाने सिल करण्याची गरज आहे. - सुखदेव पाटील, सामाजिक कार्यकर्ते - कोपरी गाव.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 आग नागरी वस्तीपासून दूर लागल्याने मोठी हानी टळली