नवी मुंबईकरांसाठी वॉटर टॅक्सी'ची सफर सुरू; आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची मागणी मान्य

७ फेब्रुवारीपासून नवी मुंबईकरांसाठी ‘वॉटर टॅक्सी' सेवा

वाशी ः वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि वेळेची बचत म्हणून ‘वॉटर टॅक्सी' पर्याय समोर येत आहे. यासाठी ‘महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड'कडून बेलापूर ते मुंबई दरम्यान ‘वॉटर टॅक्सी' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या ७ फेब्रुवारी २०२३ पासून बेलापूर ते मुंबई दरमन वॉटर टॅक्सी प्रवास सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात येणार आहे.
दिवसेंदिवस खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. परिणामी रस्ते मार्गाने प्रवास करताना विशेषतः मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते. याशिवाय भरमसाठ वाहनांमुळे वायू प्रदूषणात देखील भर पडत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून नागरिकांचा प्रवास सुकर  आणि प्रदूषण कसे कमी करता येईल यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर विद्युत बस सेवेचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. शिवाय आता जल वाहतुकीवर देखील भर दिला जात आहे.
नवी मुंबई शहराला विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे नवी मुंबई मधून जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. या अनुषंगाने बेलापूर ते मुंबई दरम्यान जलप्रवास करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. याअनुषंगाने नवी मुंबईतून पहिल्यांदा जलवाहतूक प्रवास सुविधा सुरु करण्यात येत असून, बेलापूर ते मुंबई दरम्यान जलप्रवास अवघ्या तीस मिनिटात पार करता येणार आहे. टप्प्याटप्प्यात नवी मुंबई मधून मुंबई, जेएनपीटी, एलिफंटा, रेवस या ठिकाणी जाण्यासाठी ‘वॉटर टॅक्सी'चा पर्याय उपलब्ध होणार आहे. प्राथमिक स्वरुपात बेलापूर ते मुंबई दरम्यान जल प्रवास सुरू करण्यात येत आहे. बेलापूर ते मुंबई दरम्यानची ‘वॉटर टॅक्सी' १४ ते ५० आसनी क्षमतेची असून, बेलापूर ते मुंबई दरम्यान ‘वॉटर टॅक्सी' मधून प्रवास करण्याकरिता प्रवाशांना २५०-३५० रुपये मोजावे लागणार आहेत. बेलापूर ते मुंबई दरम्यान सुरु होणाऱ्या ‘वॉटर टॅक्सी'ला नवी मुंबईकर किती पसंती देतात ते पुढील कालावधीतच स्पष्ट होणार आहे.
‘महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड'कडून बेलापूर मध्ये जेट्टी बांधून ‘वॉटर टॅक्सी' सेवा मागील वर्षी सुरु करण्यात आली होती. मात्र, अधिक भाडे असल्याने या सेवेकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे बेलापूर ते मुंबई ‘वॉटर टॅक्सी' सेवेचे भाडे कमी करावे, अशी मागणी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्य विधीमंडळ अधिवेशनात केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून, आता कमी भाडे आकारुन बेलापूर ते मुंबई ‘वॉटर टॅक्सी' सेवा सुरू होत आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अतिक्रमित जागा संरक्षित केल्यास अवैध बांधकामांना चाप