पाणथळावर गोल्फ कोर्स; मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

पाणथळावर गोल्फ कोर्स संर्दभात  पर्यावरणवाद्यांच्या तक्रारीची दखल

नवी मुंबई ः नेरुळ येथील एनआरआय आणि टीएस चाणक्य या पाणथळ क्षेत्रावर गोल्फ कोर्स प्रकल्पासाठी महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) दिलेल्या सीआरझेड परवानगी विरोधात पर्यावरणवाद्यांनी केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. पर्यावरणवाद्यांच्या तक्रारीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास आणि पर्यावरण विभागाच्या प्रमुख सचिवांना या प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत.

वन विभाग आणि कांदळवन कक्ष तर्फे ठाणे खाडी पलेमिंगो अभयारण्याच्या (टीएसएफएस) व्यवस्थापन आराखड्याचा एक भाग म्हणून सहा पाणथळ क्षेत्रांचे जतन करण्याचे नियोजन करीत असताना, ‘एमसीझेडएमए'ने या दोन्ही पाणथळ क्षेत्रांवर गोल्फ कोर्ससाठी सीआरझेड परवानगीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात निर्णय प्रलंबित असताना देखील ‘एमसीझेडएमए'ने गोल्फ कोर्ससाठी ७ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सीआरझेड मंजुरीची बाब पुढे केली. या निर्णयाबद्दल पर्यावरण तज्ञांनी आश्चर्य व्यवत केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१८ मध्ये ३२ हेक्टरमध्ये पसरलेल्या तीन आझाद मैदानांच्या आकारा एवढ्या एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ क्षेत्रांवर नियोजन केलेल्या गोल्फ कोर्स प्रकल्प रद्दबादल ठरविला होता. मुंबई हायकोर्टाच्या सदर निर्णयाविरोधात स्पेशल लीव्ह पिटीशन घेऊन‘सिडको'ने सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. परंतु, या प्रकरणी अद्याप सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणे अजुन बाकी असल्याची बाब ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी तक्रारीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली.

पुराच्या पाण्याला स्पंजाप्रमाणे शोषून घेणाऱ्या पाणथळ क्षेत्रांवर भराव घालण्याच्या नियोजनाविरुध्द ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने केंद्र आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेलद्वारे नवीन तक्रार केली होती. सदर तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांना सदर प्रकरणामध्ये पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि.ने (एनएमआयएएल) पर्यावरण प्रभाव परीक्षण
(एन्वॉयर्नन्मेंट इंपॅक्ट असेसमेंट) अभ्यासाच्या आधारावर पर्यावरण मंजुरीचे (इसी) प्रमाणपत्र मिळवले होते. सदर पर्यावरन परीक्षण अभ्यासांतर्गत एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ स्थळांवरील गोल्फ कोर्सचे नियोजन रद्द करण्यात आले असून या पाणथळ क्षेत्रांना स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे गंतव्य स्थान म्हणून जतन केले पाहिजे, अशी शिफारस द बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) संस्थेने केली होती. दुसरीकडे ‘सिडको'ने आपल्या एससी याचिका मागे न घेता गोल्फ कोर्सचे नियोजन अजूनही आपल्या अजेंड्यावर ठेवले आहे. त्यामुळे ‘नॅटकनेवट'ने सदर बाब ठळकपणे नमूद करीत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण मंत्रालयाला (एमओइएफसीसी) नवी मुंबई विमानतळाला दिलेली पर्यावरण मंजुरी रद्द करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, पाणथळ क्षेत्रांना स्थलांतरीत आणि स्थानिक पक्ष्यांच्या रहिवासाच्या जागांच्या स्वरुपात जतन केले पाहिजे. अन्यथा उड्डाण करणारे पाहुणे आपली नेहमीची स्थाने न मिळण्याच्या स्थितीत विमानतळावर ठाण मांडण्याची शक्यता आहे, असे ‘बीएनएचएस'चे संचालक डॉ. बिवाश पांडव यांनी याबाबत ‘नॅटकनेवट'कडे स्पष्टीकरण देताना नमूद केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केंद्र शासनातर्फे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय हेल्पलाईन सुरु