नागरी विकासातील विशेष कामगिरीबद्दल नवी मुंबई महापालिकेला ‘कन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड-२०२३' या पुरस्काराने सन्मानित
महापालिकेचा ‘कन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड'ने गौरव
नवी मुंबई ः सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराने गुणात्मक नागरी सुविधा आणि अत्याधुनिक प्रकल्पांमुळेही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. नागरी विकासातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी मुंबई महापालिकेला नोएडा येथील विशेष समारंभात ‘कन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड-२०२३' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महापालिकेच्या वतीने अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सदर सन्मान स्विकारला.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सायन्स पार्क, सेंट्रल लायब्ररी, एनएमएमटी उपक्रमाची वाशी येथील बहुउपयोगी आकर्षक इमारत यासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारले जात असून यापूर्वीच्या लौकिकात लक्षणीय भर टाकली जात आहे. उद्यानांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात वंडर्स पार्क, पंचतत्वावर आधारित सेंट्रल पार्क, झेन गार्डन, संवेदना उद्यान, निसर्ग उद्यान, रॉक गार्डन अशा विविध संकल्पनांवर आधारित थीम पार्क विकसित करण्यात आलेली आहेत. महापालिकेची मुख्यालय वास्तू देशातील वास्तुरचनेचा एक आदर्शवत नमूना मानला जात असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची रचना आणि त्याचा डोम वास्तुकलेचा वैशिष्ट्यपूर्ण नमूना म्हणून ओळखला जातो. महापालिकेच्या वतीने कोणताही प्रकल्प, वास्तू उभारताना त्यामध्ये कामाच्या गुणवत्तेसोबतच त्याची वास्तुरचनाही वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे कोणतीही नागरी सुविधा दर्जेदार आणि लोकोपयोगी असण्यावर भर दिला जातो.
अशा विविध बाबींचा विचार कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्डच्या त्रयस्थ परीक्षण समितीने बारकाईने केलेला असून बांधकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्प क्षेत्रातील अभिनव आणि सर्वोत्तम कामगिरी याबद्दल नवी मुंबई महापालिकेची निवड नगरविकास क्षेत्रातील सर्वोत्तम महापालिका म्हणून ‘कन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड' करिता केलेली आहे.
सदर पुरस्कार केवळ नागरी सुविधा पुरवठा क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे जनतेला होत असलेल्या लाभापुरता सिमीत नाही तर त्यापुढे जात महापालिकेला प्रदान केला जाणारा पुरस्कार इतरांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे परीक्षण समितीने नमूद केलेले आहे.
एआरके इव्हेन्ट्स ॲण्ड मिडीया प्रा.लि. संचालित कन्स्ट्रक्शन टाईम्स या मासिकात नगरविकास क्षेत्राशी संबंधीत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, समूह यांची नोंद घ्ोत त्यांच्या उल्लेखनीय कामांची माहिती प्रसिध्द करुन लोकांमध्ये प्रसारित केली जात असून ‘कॉनएक्स्पो इंडिया' सारखा भव्यतम उपक्रम राबवून त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना गौरविण्यात येते. यामध्ये महापालिकेच्या उल्लेखनीय पायाभूत नागरी सुविधा कामांचा आणि बांधकामे आणि वास्तुंचा विचार करून ‘कन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड' प्रदान करुन गौरविण्यात आले आहे.
सदर पुरस्काराचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा-वित्त अधिकारी जितेंद्र इंगळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील आणि शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, मदन वाघचौडे उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेच्या नागरी विकास कामांचा अभ्यास करुन माध्यम क्षेत्रातील नामांकित संस्थेने ‘कन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड'ने सन्मान करणे समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. यामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या शहर अभियंता संजय देसाई आणि त्यांच्या सर्व अधिकारी, कर्मचारी समुहाचे कौतुक आहे.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.