बाबा महाराज सातारकर यांना पत्नी शोक
ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर यांचे निधन
नवी मुंबई ः ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर यांचे निधन झाले. नेरुळमध्ये त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या अध्यात्माच्या विचार प्रसाराच्या कार्यात त्यांनी सक्रिय योगदान दिले. रुक्मिणी सातारकर यांच्या पार्थिवावर २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाबा महाराज सातारकर यांनी १९८३ पासून संतांच्या गावी दरवर्षी किर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरु केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदि ठिकाणी किर्तन सप्ताहांचे आयोजन केले. त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञानप्रसार संस्थेचीही स्थापना केली आहे. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते. बाबा महाराज सातारकर यांच्या धार्मिक कार्यात त्यांच्या पत्नी रुक्मिणी उर्फ आईसाहेब यांचीही मोलाची साथ होती. २४ मार्च १९५४ साली देशमुख दिंडीचे वीणेकरी पांडुरंग जाधव यांची सुलक्षणी नात दुर्गा हिने एका गोरज मुहूर्तावर सकलसौभाग्यसंपन्न रुक्मिणी बनून बाबा महाराजांच्या जीवनात लक्ष्मीच्या पाऊलांनी पदार्पण केले. त्यांच्या संसारवेलीवर भगवती, रासेश्वरी आणि चैतन्य अशी फुले ऊमलली. एक भाग्यशाली संसार विश्वकल्याणार्थ अवतीर्ण झाला. मात्र, बाबा महाराज यांचा एकुलता एक तरुण मुलगा चैतन्य त्यांचा अकस्मात कारणामुळे मृत्यू झाला. बाबा महाराज यांच्या घरात गेल्या १३५ वर्षांपासून वारकरी सांप्रदयाची परंपरा आहे. बाबा महाराज सातारकर यांचे इंग्रजी माध्यमातून एसएससीपर्यंत शिक्षण झाले आहे. वयाच्या ८व्या वर्षांपासून ते किर्तनात अभंगाच्या चाली म्हणायचे. बाबा महाराज यांच्याकडे गेल्या ८० वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानकरी परंपरा आहे. तर तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर त्यांनी मानकरी परंपरा १०० वर्षांपासून राखली आहे.