व्यवसाय सुलभता ‘सिडको'चे पोर्टलद्वारे अर्ज सादर करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध

 ई-प्रशासनाच्या दिशेने ‘सिडको'चे आणखी एक क्रांतिकारी पाऊल

नवी मुंबई ः ई-प्रशासनाच्या दिशेने ‘सिडको'ने आणखी एक क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. ‘सिडको'कडून व्यवसाय सुलभता (इज ऑफ डुइंग बिजनेस) पोर्टल मार्फत देण्यात आलेल्या सेवांसंदर्भात शून्य प्रलंबितता (झिरो पेंडन्सी) चे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. व्यवसाय सुलभता पोर्टल मार्फत करुन देण्यात आलेल्या सेवांविषयक प्रकरणे जलद गतीने मार्गी लावून‘सिडको'ने शून्य प्रलंबितता साध्य केली आहे. तसेच व्यवसाय सुलभता पोर्टल संबंधी विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी ‘सिडको'मार्फत व्यवसाय सुलभता कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. सर्व ऑनलाइन सेवा एकाच ठिकाणी ‘एक खिडकी निपटारा (सिंगल विंडो क्लिअरन्स) पध्दतीने उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सिडको'तर्फे  www.cidcoindia.com/eodb  या व्यवसाय सुलभता पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या व्यवसाय सुलभता पोर्टल अंतर्गत वसाहत सेवा (६४ दुय्यम सेवा), बांधकाम परवाना सेवा (४ दुय्यम सेवा), अभियांत्रिकी सेवा (३ दुय्यम सेवा), सर्वसाधारण सेवा (४ दुय्यम सेवा) आणि नैना प्रकल्पा संदर्भातील सेवा (४ दुय्यम सेवा) उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच सदर पोर्टलद्वारे नागरिकांना अर्जाची स्थिती आणि सेवा मिळण्यासाठी लागणारा कालावधीही जाणून घेता येणार आहे.

नागरिकांना व्यवसाय सुलभता पोर्टलची माहिती करुन देण्याच्या उद्देशाने सिडको भवनच्या प्रवेशद्वारासमोरच व्यवसाय सुलभता कक्षाची सुविधा (इज ऑफ डुइंग बिजनेस सेल) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘सिडको'तर्फे या सेवांसाठीचे शुल्क वगळता व्यवसाय सुलभता पोर्टलद्वारे नागरिकांना नमूद केलेल्या सर्व सेवांसाठी अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लवकरच व्यवसाय सुलभता कक्षाची सुविधा ‘सिडको'च्या सर्व नोडल कार्यालयातही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

नागरिकांनी सदर सेवांसाठी कोणत्याही मध्यस्थ अथवा प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींच्या आमिषाला बळी न पडता सिडको भवनच्या प्रवेशद्वारासमोरील व्यवसाय सुलभता कक्षाला भेट देऊन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेच्या पत्राला एम आय डी सी कडून केराची टोपली?