मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद, दुचाकी चोरीचे 19 गुन्हे उघड

रस्त्याच्या बाजूला पार्क असलेल्या मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद

नवी मुंबई : नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे परिसरात रस्त्याच्या बाजूला पार्क असलेल्या दुचाकी वाहनांची चोरी करणा-या एका सराईत चोरट्याला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. नासीर सद्दन खान (58) असे या चोरट्यांचे नाव असून त्याने रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले वाहन चोरीचे 19 गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपीकडून 9 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 27 मोटारसायकल व स्कुटी जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ -1 चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या आरोपीकडून आणखी दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील पानसरे यांनी व्यक्त केली.

रबाळे पोलीस ठाण्याच्या हददीतुन अनेक मोटार सायकल व स्कुटी चोरीला गेल्याच्या घटना घडल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.डी.ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात, सहाय्यक फौजदर नामदेव मानकुंबरे व त्यांच्या पथकाने, ज्या भागात मोटरसायकल चोरीच्या घटना जास्त घडल्या आहेत, त्या भागात सातत्याने वॉच ठेवण्यास सुरुवात केली.

गत आठवड्यात आरोपी नासीर सद्दन खान (58) हा ऐरोली रेल्वे स्टेशनसमोर पार्क असलेल्या दुचाकी वाहनांची संशयास्पद हालचाली करताना आढळुन आला. त्यामुळे त्या भागात वॉच ठेऊन असलेल्या पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. त्यांनतर पोलिसांनी त्याच्या जवळ असलेल्या पिशवीची तपासणी केली असता,त्यात मोटरसायकलच्या चाव्या, स्कु ड्रायव्हर, कटर, पक्कड इत्यादी साहित्य आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याचे घाटकोपर पश्चिम गोळीबार रोड येथे स्वतःचे फ्रेंडस ऑटो गॅरेज असल्याचे व तो मोटर सायकल मॅकेनिक असल्याची माहिती मिळाली.

तसेच त्याच्यावर नवी मुंबई हद्दीत वाशी, नेरुळ, सिबीडी बेलापूर, खारघर पोलीस ठाण्यात तसेच मुंबईतील अंधेरी, मेघवाडी, आझाद मैदान, पवई, पार्क साईट, पंतनगर पोलीस ठाण्यात त्याचप्रमाणे ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात एकूण 46 मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तसेच वाशी पोलिसांकडून त्याला 2 वर्षासाठी नवी मुंबई व ठाणे जिल्हयातुन हददपार करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसाना मिळाली. अधिक चौकशीत रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत होंडा शाईन मोटार सायकल चोरी प्रकरणातील आरोपी हा तोच असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमधून निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

त्यानंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करून त्याच्याकडून सुझुकी ॲक्सेस, होंडा अॅक्टीवा, युनिकॉर्न, होंडा शाईन, पॅशन प्लस, पॅश्न प्रो, बजाज पल्सर, एव्हेजर अशा 27 मोटारसायकल व स्कुटी जप्त केल्या. या आरोपीने चोरी केलेल्या 8 मोटारसायकल बेवारस स्थितीत सापडल्या असून त्या रबाळे पोलिसांनी यापूर्वीच जप्त केल्या आहेत. आरोपीने आणखी 15 मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यादृष्टीने त्याची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संपामुळे एपीएमसी मार्केट मधील व्यवहार पूर्णपणे ठप्प