‘नवी मुंबई फेस्टीव्हल'ची उत्साहात सांगता

‘नवी मुंबई फेस्टीव्हल'मध्ये महाराष्ट्र संस्कृतीचा बोलबाला

नवी मुंबई ः सीवुडस्‌ येथील ग्रँड नेक्सस मॉल मध्ये नुकत्याच झालेल्या ‘नवी मुंबई फेस्टीव्हल'मध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती दर्शनाने रसिक प्रेक्षक भारावून गेले होते. या महोत्सवात महाराष्ट्रासह १३ राज्ये सहभागी झाली होती. त्या सर्वांनी आपापल्या राज्याची संस्कृती दर्शन सादर केली. ‘फेस्टीव्हल' महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय सीवुडस्‌ आणि ओंकार आर्ट या संस्थांच्या कलाकारांनी पहिल्या दिवसापासूनच ‘नवी मुंबई फेस्टीव्हल'ला येणाऱ्या लोकांच्या मनावर भुरळ घातली होती.

या कार्यक्रमात अभंग, लावणी, लेझीम, पोवाडा, भूपाळी सादर झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान पराक्रमाची ओळख शेकडो रसिकांना स्फूर्ती देऊन गेला. तर मंगळागौरीच्या खेळाचे प्रात्यक्षिक पाहून प्रेक्षकांनी वन्स मोर करत दाद दिली. ‘फेस्टीव्हल'मध्ये स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गीताने अर्थात जयो स्तुतेने रसिक मंत्रमुग्ध झाले. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील गाजलेला पोवाडा मुंबईची मैना आणि जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘नवी मुंबई फेस्टीव्हल'मध्ये पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा, दाक्षिणात्य नृत्याचे विविध प्रकार नवी मुंबईकरांना पहावयास मिळाले. याप्रसंगी कवी कुसुमाग्रज वाचनालय आणि ओंकार संस्थेच्या कलाकार तसेच पदाधिकाऱ्यांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच गेली ५० वर्षे नवी मुंबईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारे कवी कुसुमाग्रज वाचनालयाचे कार्यवाह ललित पाठक यांचा विशेष सत्कार आयोजकांतर्फ करण्यात आला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद, दुचाकी चोरीचे 19 गुन्हे उघड