९१.०२ टक्के मतदान; ३५ हजार ७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

 कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक

नवी मुंबई ः कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ रोजी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ९१.०२ टक्के मतदान झाले. मतदार यादीनुसार विभागामध्ये १७ हजार ९ पुरुष तर २१ हजार ५२० स्त्री मतदार असे एकूण ३५ हजार ५२९ शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी १६ हजार १२८ पुरुष तर १८ हजार ९४२ स्त्री अशा एकूण ३५ हजार ७० शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
ठाणे जिल्ह्यात ८८.८६ टक्के मतदान झाले असून, एकूण १५ हजार ३०० शिक्षक मतदारांपैकी १३ हजार ५९५ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पालघर जिल्ह्यात ८७.८७ टक्के मतदान झाले असून, ६ हजार ८४४ शिक्षक मतदारांपैकी ६ हजार १४ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रायगड जिल्ह्यात ९३.५६ टक्के मतदान झाले असून, १० हजार १०१ शिक्षक मतदारांपैकी ९ हजार ४५० शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रत्नागिरी जिल्ह्यात ९४.७३ टक्के मतदान झाले असून,४ हजार १२० शिक्षक मतदारांपैकी ३ हजार ९०३ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९७.४१ टक्के मतदान झाले असून, २ हजार १६४ शिक्षक मतदारांपैकी २ हजार १०८ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (सामान्य) कोकण विभाग मनोज रानडे यांनी दिली.

 कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. जिल्ह्यात  साधारणपणे  ८८.८६ टक्के मतदान झाले, अशी माहिती शिक्षक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ‘ठाणे'चे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील एकूण २० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्ह्यात एकूण १५ हजार ३०० शिक्षक मतदार होते. यामध्ये ६०२९ पुरुष आणि ९२७१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. झालेल्या मतदानात एकूण १३ हजार ५९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा निवडणूक कार्यालयाने केलेल्या जनजागृती आणि इतर उपाययोजनांमुळे शिक्षक मतदारसंघासाठी ठाणे जिल्ह्यात ८८.८६ टक्के मतदान झाले.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची मतदान प्रक्रिया निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात  आली होती. तसेच मतदान केंद्रांवर व्हिडीओग्राफी व वेबकास्टींगद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या वापरास खीळ बसावी यादृष्टीने महापालिकेकडून धडक कारवाया