मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमणार ?

नवी मुंबई -: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला मागील दीड महिन्यांपासून सभापती नाही. तर १२ जानेवारीला होणारी सभापतीची निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आल्याने  सभापती वीना बाजार समितीची निर्णय प्रकिया ठप्प झाली  आहे. त्यामुळे बाजार समितीवर लवकरच प्रशासकाची नेमणूक होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहा वर्ष प्रशासक होते. त्यानंतर २०२० मध्ये निवडणूक होऊन संचालक मंडळ स्थापन झाले आणि  अशोकराव डक सभापती झाले व  उपसभापती धनंजय वाडकर. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह सहा विभागातून निवडून आलेल्या १८ संचालकांपैकी ७ संचालकांचे पद रद्द झाले होते. त्याबाबत पणन संचालक तथा मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी घेण्यात आली असून अद्याप त्याचा निर्णय गुलदस्त्यात आहे. याच दरम्यान सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी डिसेंबर महिन्यात पणन संचालकांकडे आपला  राजीनामा दिला आहे.  तेव्हापासून ही पदे रिक्त आहेत.  त्यामुळे एपीएमसी बाजार समितीतील संचालक मंडळ अपूर्ण आहे. तर सभापती निवडीसाठी १२ जानेवारी २०२३ रोजी बैठक बोलवण्यात आली होती. मात्र या बैठकीला देखील पणन  खात्याने पुढे ढकलल्याने बाजार समिती सभापतीविनाच आहे. सभापती नसल्याने व संचालक मंडळाचे कोरम पूर्ण होत नसल्याने बाजार समितीच्या  बैठका बोलवता येत नाही. त्यामुळे समितीतील निर्णय प्रकिया पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि  याचा परिणाम  धोरणात्मक कामांवर होत असून विकास कामांना खीळ बसली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निर्णय  प्रकियेला गती देण्यासाठी बाजार समितीवर लवकरच  प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे अशी  माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती नसल्याने निर्णय प्रकिया थांबली आहे. तसेच बरेच सदस्य अपात्र  ठरल्याने कोरम पूर्ण होत नाही. त्यामुळे संचालक मंडळाची बैठक देखील घेता येत नाही. त्यामुळे बाजार समितीच्या सभापती साठी निवडणूक घ्यावी किंवा प्रशासक तरी नेमावा, म्हणून बाजार समिती प्रशासनाच्या वतीने  राज्याच्या पणन खात्याला पत्र दिले आहे. -  प्रकाश अष्टेकर, उपसचिव एपीएमसी

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 फेब्रुवारी पासून धावणार देशातील पहिली वॉटर टॅक्सी