फेब्रुवारी पासून धावणार देशातील पहिली वॉटर टॅक्सी

देशातील पहिली बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया अशी वॉटर टॅक्सी सेवा येत्या ६ फेब्रुवारी सुरु

नवी मुंबई ः देशातील पहिली बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया अशी वॉटर टॅक्सी सेवा येत्या ६ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे वॉटर टॅक्सी सेवला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार दरम्यान बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गावर धावणार आहे. या सेवेअंतर्गत सकाळी ८.३० वाजता बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया तर संध्याकाळी ६.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशा दोन फेऱ्या होणार आहेत. सदर सेवेमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ ६० मिनिटांत पार होणार आहे.

यासाठी प्रवाशांना २५० आणि ३५० रुपये मोजावे लागणार आहेत. आधी वॉटर टॅक्सीचे दर ३०० आणि ४०० रुपये असे होते. मात्र, नयनतारा शिपिंग प्रा. लि. कंपनीतर्फे प्रवासी भाड्यात ५० रुपयांची दरकपात करण्यात आली आहे. नयनतारा शिपिंग कंपनी कडून मागील दोन माहिन्यांपासून बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. नयनतारा शिपिंग कंपनीच्या या प्रयत्नांना अखेरीस यश आले असून मुंबई बंदर प्राधिकरणाने यासाठी नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानुसार आता येत्या ६ फेब्रुवारी पासून देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती नयनतारा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी