तृतीय पंथीयांनी लुटले माणुसकीचे वाण
महापे हनुमाननगर येथे २९ जानेवारी रोजी तृतीय पंथियांनी लुटले माणुसकीचे वाण
वाशी ः मकर संक्रांती पासून महिला वर्ग हळदी-कुंकू समारंभ साजरे करुन वस्तुरुपी वाण लुटतात. मात्र, महापे हनुमाननगर येथे २९ जानेवारी रोजी तृतीय पंथियांनी स्वतः साठी हळदी कुंकू समारंभ साजरा करुन एकप्रकारे माणुसकीचे वाण लुटले आहे.
हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते. सदर समारंभ विशेषतः महिला वर्ग साजरा करतात. मात्र, आपल्या समाजात आज मोठ्या प्रमाणात तृतीय पंथीय समाज असून त्यांचे राहणीमान काही अंशी महिलांसारखेच असते. त्यांच्यासाठी विशेष असा कुठलाच सण नाही. त्यामुळे पूर्ण महिला जरी नसल्या तरी महिलांचे बरेच गुण तृतीय पंथीयांमध्ये दिसून येतात. निसर्गाने जरी झिडकारले असले तरी आपणच आपले सुख दुःखाचे वाटेकरी आहोत. हीच भावना मनात ठेवून हळदी-कुंकू लावून एकमेकांच्या जीवासाठी कार्य करावे म्हणून तृतीय पंथीयांनी हळदी कुंकू समारंभ आयोजित करुन खऱ्या अर्थाने माणुसकीचे वाण लुटले. याप्रसंगी समाजसेवक निशांत पाटील, दिपेश पाटील, मनसे विभाग अध्यक्ष नागेश लिंगायत, युवा नेते ॲड.अमोल उघाडे, आदि उपस्थित होते.
तृतीयपंथीय देखील एक माणूस आहे. त्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हीच आमच्या सुख दुःखाचे वाटेकरी आहोत. हळदी-कुंकू लावून आम्ही एकमेकांच्या जीवासाठी कार्य करण्याचा संदेश आम्ही देत आहोत. -हिना शेख, तृतीय पंथीय.