महापालिकेच्या सातत्यपूर्ण गुणवत्ता उंचाविणाऱ्या स्वच्छतेकडून समृध्दीकडे कामगिरीचा गौरव
नवी मुंबई महापालिकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान
नवी मुंबई ः सन २००२-०३ मधील महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान पासून राज्यात स्वच्छतेमध्ये नेहमीच सर्वप्रथम क्रमांकावर असणारे नवी मुंबई शहर सन २०२२ मध्येही केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात अव्वल आणि देशात तृतीय क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकित आहे. या सातत्यपूर्ण उज्वल यशस्वी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते नवी मुंबई महापालिकेला ‘सकाळ सन्मान' प्रदान करुन गौरविण्यात आले. महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी मुंबईतील समारंभात ‘सकाळ समुह'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या उपस्थितीत सदर बहुमान स्वीकारला.
हागणदारी मुक्त शहरांच्या ओडीएफ कॅटेगरीत नवी मुंबई देशातील सर्वोच्च वॉटर प्लस मानांकित शहर आहे. त्याचप्रमाणे कचरामुक्त शहराच्या कॅटेगरीत नवी मुंबई राज्यातील एकमेव फाईव्ह स्टार मानांकित शहर आहे. केंद्र सरकार तर्फे आयोजित केलेल्या ‘इंडियन स्वच्छता लीग'मध्ये राष्ट्रीय स्तरावरील १० लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये सर्वोत्तम युवक सहभागाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार नवी मुंबईला प्राप्त झालेला आहे. याशिवाय इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत आयोजित केलेल्या तीन उपक्रमांची विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्' मध्ये झालेली आहे. राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान' यामध्येही नवी मुंबईस राज्यातील प्रथम क्रमांकाच्या पर्यावरणशील शहराचा बहुमान लाभलेला आहे. इंडियन रेटिंग अँड रिसर्च या राष्ट्रीय स्तरावरील र्अथविषयक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने ‘इंडिया डबल ए प्लस स्टेबल' असे सर्वोत्तम आर्थिक पतमानांकन सतत आठ वर्षे नवी मुंबईने कायम राखले आहे. अशाप्रकारे आर्थिक सक्षमतेचे मानांकन संपादन करणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे.
स्वच्छतेसोबतच महापालिकेने राबवलेल्या नाविन्यपूर्ण सुशोभिकरण कामांची दखल मुख्यमंत्री महोदयांसह अनेकांनी विविध माध्यमांतून वेळेवेळी घेतलेली आहे. नवी मुंबईच्या स्वच्छतेचे आणि सुशोभिकरण पॅटर्नचे अनुकरण ठिकठिकाणी केले जात आहे. अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्माची नोंद घेत नवी मुंबई महापालिकेला ‘सकाळ सन्मान' या विशेष पुरस्काराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
नवी मुंबई महापालिका सातत्याने आपल्या कामाची गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. सदर पुरस्कार म्हणजे स्वच्छता आणि सुशोभिकरणातील वैशिष्ट्यपूर्ण कामांची पोचपावती आहे. या पुरस्कारामध्ये नवी मुंबईकर नागरिकांचे, स्वच्छताकर्मींचे आणि चित्र-शिल्प कलाकारांचे महत्वाचे योगदान आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.