महापालिका मुख्यालयात स्वकाव्यवाचन, निबंध स्पर्धा संपन्न
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महापालिका तर्फे विविध कार्यक्रम
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा'चे औचित्य साधून मराठी भाषेचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या करिता आयोजित स्वकाव्यवाचन स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्या आल्या होत्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ २७ जानेवारी रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी करिश्मा नायर, प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, समाज विकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, भांडार विभागाचे उपायुक्त अनंत जाधव, स्वकाव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक कविवर्य साहेबराव ठाणगे, निबंध स्पर्धा परीक्षक साहित्यिक संपादक राजेंद्र घरत, आदि उपस्थित होते.
‘भाषा संवर्धन पंधरवडा'मध्ये सादर झालेल्या भाषाविषयक विविध कार्यक्रमांतून प्रेरणा घेऊन मराठी भाषा आणि साहित्य संवर्धनाचे कार्य यापुढेही सतत सुरु राहिले पाहिजे. त्यासाठी मराठी भाषेत संवाद साधणे, मराठी पुस्तकांचे अधिकाधिक वाचन करणे तसेच मराठी भाषेतून लिखाण करण्याचा वसा आपण घेतला पाहिजे. शासन स्तरावरुन मराठी भाषा संवर्धनासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांना प्रत्येक मराठी भाषिकाने स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत साथ दिली पाहिजे, अशा शब्दात अतिरिवत आयुवत काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. मुलांनी आजच्या जगात सक्षमपणे उभे रहावे म्हणून इंग्रजी माध्यमातून त्यांना शिक्षण देण्याचे सार्वत्रिक चित्र आज घराघरांतून दिसून येते. या परिस्थितीतही आपली मायबोली मराठी प्रचलित राहण्यासाठी घरात मुलांशी मराठीत बोलण्याची आणि त्यांच्यामध्ये इंग्रजीप्रमाणेच मराठी भाषेचीही गोडी वाढण्यासाठी पालकांमार्फत प्रयत्न व्हावेत. एकंदरीतच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी भाषा जिवंत ठेवण्याची महत्वाची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे काकडे यांनी सांगितले. सुप्रसिध्द कवी साहेबराव ठाणगे यांनी स्वकाव्यवाचन स्पर्धेत सादर झालेल्या ३६ कवीच्या कवितांचे परीक्षण करुन पूर्वसुरींच्या उत्तमोत्तम कवितांचे वाचन करण्याचा सल्ला दिला. निबंध अथवा लेखासारखी आडव्याऐवजी उभी लिहिली म्हणजे कविता होत नाही, तर कमीत कमी शब्दांमध्ये आशय मांडण्याची ताकद कवितेमध्ये असते. सदर बाब लक्षात घ्ोत स्वतःला व्यक्त करीत लिहीत राहिले पाहिजे, असे त्यांनी सहभागी कवींना सांगितले. साहित्यिक संपादक राजेंद्र घरत यांनी निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना सर्वप्रथम २१९ इतक्या मोठ्या संख्येने सहभाग घेणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ‘पर्यावरण संवर्धन-माझी संकल्पना' तसेच ‘जागर अभिजात मराठीचा' या दोनपैकी एका विषयावर निबंध सादर करताना निदर्शनास आलेल्या त्रुटींवर देखील त्यांनी खुसखुशीत अभ्यासपूर्ण भाष्य केले. आपण मराठी साहित्य वाचनाकडे वळलो याचा विशेष उल्लेख करीत स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्य कायम राखा, असा सल्ला राजेंद्र घरत यांनी दिला.
निबंध-स्वकाव्यवाचन स्पर्धेतील विजेतेः
निबंध स्पर्धा २१९ निबंधांमधूनः लवेश पाटील-प्रथम, सुहासिनी वाळुंज-द्वितीय, चित्रा बाविस्कर-तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ-अनुजा खरसंबळे, लीना पाटील, डॉ. लालन पाटील, अनिता खैरनार, राहुल कांबळे, नारायण लांडगे यांना उत्तेजनार्थ पारितोषिकांनी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले. स्वकाव्यवाचन स्पर्धा ३६ कवींमधूनः पुष्पांजली कर्वे यांनी प्रथम, प्रवीण जाधव यांनी व्दितीय, पंकज बोराडे यांनी तृतीय क्रमांक संपादन केला. सानिका शेटे, कांचन माळी, चित्रा बाविस्कर, भावना पवार, अभय जाधव.