‘नवी मुंबई सांस्कृतिक कला-क्रीडा महोत्सव-२०२३'चा समारंभ उत्साहात मराठी नृत्यगीताच्या कार्यक्रमाने ‘महोत्सव'ची सांगता

‘नवी मुंबई सांस्कृतिक कला-क्रीडा महोत्सव'ची सांगता

नवी मुंबई ः श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या माध्यमातून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने सीबीडी, सेवटर-१ मधील सुनिल गावस्कर मैदानात १० दिवस रंगलेल्या ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला-क्रीडा महोत्सव-२०२३'चा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. मराठी दौलत लाखाची या मराठी नृत्यगीताच्या कार्यक्रमाने ‘महोत्सव'ची समाप्ती करण्यात  आली. यावेळी ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या सभासद महिलांनी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत नृत्य करुन कार्यक्रमाचा आनंद लुटला. गेले दहा दिवस विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तुंचे स्टॉल्स तसेच मोठमोठे पाळणे ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला-क्रीडा महोत्सव'चे प्रमुख आकर्षण होते. हळदी कुंकू समारंभ, मेहंदी आणि पाककला, आम्ही दोघे राजराणी यासारख्या मनोरंजक कार्यक्रमाचा आनंद सीबीडीवासिय महिलांनी लुटला. तर शेकडो विद्यार्थ्यांनीही चित्रकला स्पर्धेत विविध प्रकारच्या चित्रांच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना स्वच्छतेचेे संदेश दिले. ‘महोत्सव'मध्ये अनेक थोरा-मोठ्यांनी बक्षिसांची लयलूट केली असून सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात आले. महोत्सवात विशेष करुन ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय ठरली असून महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांनीही या ‘महोत्सव'मध्ये आपली कला सादर केली.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोफत महाआरोग्य शिबीर संपन्न झाले असून हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावेळी मोफत औषधे, चष्मे आणि च्यवनप्राश वितरण करण्यात आले. ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला-क्रीडा महोत्सव'ची सांगता मराठी गीतनृत्याने झाल्याने असंख्य थोरा-मोठ्यांनी नृत्य करुन त्याचा आनंद लुटला.

श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या वतीने सांस्कृतिक, कला-क्रीडा क्षेत्रातील होतकरु, तरुण, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी न्‘नवी मुंबई सांस्कृतिक कला-क्रीडा महोत्सव'चे आयोजन गेली २७ वर्षे केले जात आहे. संस्थेने राबविलेल्या अशा उपक्रमातून आपल्या सुप्त कला-गुणांना वाव देण्याची संधी अशा कलाकारांना मिळत असते. आतापर्यंत या व्यासपीठावर तयार झालेले अनेक कलाकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करीत आहेत, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका मुख्यालयात स्वकाव्यवाचन, निबंध स्पर्धा संपन्न