१ फेब्रुवारी रोजी माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप

माथाडी कामगारांचा १ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा

वाशी : माथाडी कामगारांच्या समस्यांबाबत वारंवार मागणी करुन देखील  सरकारने त्या तत्परतेने सोडविण्यासाठी कार्यवाही केली नाही, तर येत्या १ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने त्वरित लक्ष घालावे आणि सदर प्रश्नांची सोडवणूक करावी यासाठी २५ जानेवारी रोजी माथाडी भवन येथे ‘युनियन'तर्फे मुकादम, कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत ‘युनियन'चे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. आम्ही अनेकवेळा माथाडी कामगारांच्या प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे, आंदोलन केली. तसेच शासनाच्या विविध खात्यांकडे आणि संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावाही केला. मात्र, सरकार माथाडी कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच आता जर सरकारने माथाडींच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी कार्यवाही केली नाही तर येत्या १ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार असल्याचा इशारा नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिला.

माथाडी कामगारांच्या समस्यांमध्ये सल्लागार समितीची पुर्नरचना करणे, पुनर्रचित सल्लागार समितीवर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करणे, सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन पुनर्रचित माथाडी मंडळांवर ‘युनियन'च्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करणे, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, अनुज्ञाप्ती धारक तोलणार-मापाडी कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेणे, माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी गृह खात्याने संबंधितांची समिती गठीत करावी आणि पोलीस संरक्षणाचे नवीन परिपत्रक पोलीस यंत्रणेकडून त्वरित काढावे, अशा विविध मागण्यांबाबत संघटनेने सातत्याने पाठपुरवा केला आहे. मात्र, सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच माथाडी कामगारांच्या कामगार, गृह, पणन आणि सहकार तसेच संबंधित खात्याअंतर्गत असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार लाक्षणिक संप करतील, असे नरेंद्र पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शैक्षणिक शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरुन देण्यासाठी येत्या १५  फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ