सीवुडस्‌ येथील ग्रँड सेन्ट्रल मॉलमध्ये फ्लॅश मॉब सारखा वेगळा उपक्रम

फ्लॅश मॉबद्वारे देशभक्तीसह स्वच्छता संदेशाचे प्रसारण सीवुडस्‌ ग्रँड सेन्ट्रल मॉलमध्ये महापालिकेचा अनोखा उपक्रम

नवी मुंबई ः ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३' अंतर्गत स्वच्छतेचा प्रचार, प्रसार करताना नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नेहमीच नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर केला जात आहे. त्याअनुषंगाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सीवुडस्‌ येथील ग्रँड सेन्ट्रल मॉलमध्ये फ्लॅश मॉब सारखा वेगळा उपक्रम महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

प्रजासत्ताक दिन म्हणजे सर्वांचा सुट्टीचा दिवस. सकाळी ध्वजारोहणास उपस्थित राहिल्यानंतर संध्याकाळी कुटुंबियांना घेऊन शहरात विरंगुळा म्हणून फेरफटका मारत आनंद साजरा करण्याची लोकांची सवय. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मॉलमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येत असतात, ते लक्षात घेत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एखाद्या मोठ्या मॉलमध्ये पलॅश मॉब करण्याचे निश्चित केले. गीतनृत्याच्या अविष्कारातून कचरा वर्गीकरण आणि स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी सीवुडस्‌ ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये सायं. ७ वाजता मॉलमध्ये अचानक मोठ्याने संगीत वाजू लागले आणि मॉलमध्ये असलेल्या गर्दीला नेमके कळेना की काय सुरू आहे. बघता बघता मॉलच्या मधल्या मोठ्या पॅसेजमध्ये युवक-युवतींचा मोठा समुह एकेककरुन पुढे आला आणि गीतसंगीताच्या तालावर बहारदार नृत्याविष्कार सुरु झाला. मॉलमध्ये ठिकठिकाणी विखुरलेल्या लोकांना राहवले नाही, ते त्या पॅसेजच्या भोवताली वर्तुळाकार उभे राहू लागले. लोकगीते, देशभक्तीपर गीते यासोबतच स्वच्छता विषयक गीतांनी मॉलचा
माहौल बदलून टाकला.

नृत्याविष्कारामध्ये गाण्यांतून तसेच नृत्य सादरीकरणातून कचरा वर्गीकरणाचा संदेश प्रसारित करण्यात आला. कचरा डब्यांच्या मॅस्कॉट मधून स्वच्छता संदेशाचे प्रसारण झाले. तिरंगी कापडी पट्टे झळकावित नाचणाऱ्या नृत्यसमुहाने रोमांच उभे केले. नृत्य कलावंतांचे आकर्षक टी-शर्टही लक्ष वेधून घ्ोत होते. स्वच्छ शाळेचा राष्ट्रीय पुरस्कार लाभलेल्या आंबेडकर नगर, रबाले येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या १०७ मुला-मुलींनी विविध गाणी एकामागे एक जोडलेला धमाकेदार पलॅश मॉब करीत मॉलमधील उपस्थितांचे लक्ष वेधून घ्ोत स्वच्छ सर्वेक्षणाचा संगीतमय नृत्य प्रचार केला. शेवटी कलावंतांनी सर्वेक्षणाचा फलक उंचावला तेव्हा नागरिकांनीही या कलावंतासमवेत ‘निश्चय केला, नंबर पहिला' असा एकमुखाने गजर केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१ फेब्रुवारी रोजी माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप