पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजुच्या मार्गाचे काम पूर्ण

ऐरोली-काटई नाका प्रकल्पातील डावा बोगदा खुला

नवी मुंबई ः ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'च्या ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजुच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून नियंत्रित स्फोट पध्दतीचा वापर करुन सदर बोगदा दोन्ही बाजुने खुला करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पातील डाव्या बाजुच्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे  काम आता पूर्ण झाले असून बोगदा दोन्ही बाजुने खुला झाला आहे. सदर प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ‘एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या ऐरोली ते कटाई भुयारी मार्गातील डाव्या बाजुकडील बोगदा दोन्ही बाजूकडून जोडण्यात आला आहे. सदर ऐरोली-काटई प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, ऐरोली, नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यामुळे सात कि.मी.चे अंतर कमी होणार असून नवी मुंबई येथून डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत कमालीची बचत होणार असून इंधनाचीही बचत होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे नागरिकांच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

राज्य शासनाच्या वतीने अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. शिळफाटा ते कल्याण आणि कल्याण ते भिवंडी असा थेट एलिव्हेटेड उड्डाणपुल करणार आहोत. तसेच कल्याण ते तळोजा मेट्रो असा दुमजली रस्ता आणि मेट्रो असलेला मार्गाचे नियोजन आहे. याशिवाय मानकोली-डोंबिवली या खाडीपुलाच्या कामामुळे अंतर कमी होईल. ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चेंबूर फ्रीवे जेथे उतरतो, त्या ठिकाणाहून थेट फाऊंटनपर्यंत शहराच्या बाहेरुन बायपास करतोय. ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी असे अनेक प्रकल्प राबवित आहोत. मुंबई आणि  मुंबई महानगर परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी डबलडेकर टनेल अशी संकल्पना राबविणार आहोत. जेणेकरुन मुंबई आणि एमएमआर मधील लाखो प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका होऊन त्यांचे जीवन सुसह्य होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अपोलो हॉस्पिटल्स येथेही नवीन ध्वज चौकीच्या उद्‌घाटनासोबत प्रजासत्ताक अनाेख्या पद्धतीने साजरा