‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती' तर्फे पहिल्यांदाच कार्ला लेण्यांवर प्रजासत्ताक दिन साजरा

कार्ले लेणीवर प्रथमच प्रजासत्ताक दिन साजरा

नवी मुंबई ः २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले तेव्हपासून या ७४ वर्षात भारताचा राष्ट्रीय ठेवा, राष्ट्रीय स्मारक असलेल्या कार्ला लेण्यांवर प्रजासत्ताक दिन साजरा झाला नव्हता. मात्र, यंदा ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती'ने पहिल्यांदाच कार्ला लेण्यांवर प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. यावेळी तीन हजाराहुन अधिक सर्व जाती, पंथ, धर्माचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोणतीही भाषणे न होता, आपल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. कार्ले लेणी आणि आई एकविरा चरणी प्रथमच प्रजासत्ताक दिनी भारताच्या राष्ट्रध्वजास मानवंदना दिली गेली. सदरची ऐतिहासिक घटना मानली जात आहे.  कार्ले येथील लेण्यांचा ऐतिहासिक संदेश आणि संविधानाचा एकच भावार्थ आहे, तो म्हणजे आम्ही सर्व भारतीय एक आहोत समान आहोत. साऱ्या जगातील व्यापारी, तत्वज्ञ ,राजे महाराजे, कलाकार ते सर्वसामान्य स्त्री-पुरुष यांनी गजबजलेले एक जागतिक किर्तीचे कार्ले लेणी ठिकाण आहे. कोकणातील आगरी-कोळी, कराडी, भंडारी, बारा बलुतेदार सागरपुत्रांची विवाहात हुंडा नाकारुन स्त्री-पुरुष समतेच्या तत्वाने, स्त्रियांना समाज जीवनात अत्यंत आदराचे स्थान देणाऱ्या आई एकवीरेच्या मातृसत्ताक विचारांची प्रेरणा येथील एकविरा मातृस्थानात आहे. या परिसराच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास केल्यास कार्ला लेणी आई एकविरा या उत्तर कोकणच्या अपरांत प्रदेशातील मागील दोन हजार वर्षांची आंतरराष्ट्रीय मैत्री भावनेची सागरी संस्कृती सांगतात.

रायगड, ठाणे, मुंबई येथील सरकारी गॅझेटचा अभ्यास केल्यास काही महत्वाच्या बाबी आपल्यासमोर येतात. कार्ले लेणी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील आंतरराष्ट्रीय सागरी बंदरे बोरघाटाच्या मार्गे महाराष्ट्र आणि देशातील महत्वाच्या व्यापारी केंद्राशी जोडलेली होती. सम्राट अशोक, सातवाहन काळातील प्राचीन बंदरे मुरुड तळा, चौल रेवदंडा, पेण धरमतर खाडी, उरण, पनवेल, उलवा, आग्रोळी, बेलापूर खाडी, मुंबई, ठाणे, कल्याण, सोपारा या सागरी व्यापारी मार्गाने जोडली होती. अर्थात आजची मासेमारी बंदरे आणि तेथील मातृसत्ताक सागरी संस्कृती यांचे अतूट ऐतिहासिक नाते आज आम्हाला छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्यातील नौदलातील आगरी कोळी भंडारी सागरी सैनिकांच्या इतिहासापर्यंत घ्ोऊन येते, अशी माहिती ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी दिली.

इ.स.पूर्व पहिले शतक ते इ.स.५ वे शतक या काळात कार्ले लेणी दगडात खोदलेली आहेत. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे इ.स.१९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. साऱ्या भारतीयांसाठी आणि तसेच जगभरातील पर्यटक आणि अभ्यासकांसाठी सदर अत्यंत मौल्यवान ठेवा आहेत. देशाच्या समस्त नागरिकांना संविधानिक समतेची जीवन मूल्ये सांगणारी शिल्पे आहेत. सत्व सांगणारी मातृसत्ताक आई एकविरा आणि माता प्रजापती या बौध्द लेण्यातील भगवान बुध्दांच्या आई आणि मावशी आहेत. कार्ले लेण्यातील चैत्य स्तुपाला फेरी मारुन आपल्या बालकांचे जावळ (डोक्यावरील केस) काढण्याचा बाळ संस्कार आगरी-कोळी, कराडी, भंडारी, सागरपुत्र आणि कार्ले लेणी यांचे २००० वर्षांचे सांस्कृतिक नातेसंबंध सांगत आहे.

अशा या ऐतिहासिक ठिकाणी कुणीही गेल्या ७४ वर्षात प्रजासत्ताक दिन साजरा केला नाही. सदर बाब ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती'च्या लक्षात आल्यानंतर ‘समिती'च्या पदाधिकाऱ्यांनी २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी कार्ले लेणी आणि आई एकविरा चरणी प्रथमच भारताच्या राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तसेच भारतीय संविधानाचे प्रास्ताविक आणि राष्ट्रगीत गाऊन इतिहास घडवला आहे. या ऐतिहासिक प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ‘महोत्सव समिती'चे पदाधिकारी आणि तीन हजार बंधू-भगिनी, मुले-मुली मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजुच्या मार्गाचे काम पूर्ण