वैदभियांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न

नवी मुंबई ः नोकरी, व्यवसायानिमित्त आपापल्या गावांपासून शेकडो किलोमीटर दूर आलेल्या वैदर्भियांचा खारघर येथे स्नेहमिलन सोहळा नुकताच पार पडला. आपला विदर्भ या संघटनेने आयोजित केलेल्या या स्नेहमिलनामुळे वाशी ते पनवेल, उरण ते उलवे या परिसरात राहणाऱ्या वैदर्भियांना पहिल्यांदाच एकमेकांना भेटायची, संवादाची संधी मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

खारघर येथील एमटीडीसी रेसिडेन्सी येथे २२ जानेवारी रोजी सदर सोहळा पार पडला. या कार्यक्रमास वैदर्भियांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून भविष्यात नवी मुंबईतील वैदर्भियांना संघटित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. चंद्रपूर, गडचिरोली ते बुलढाणा पर्यंत पसरलेल्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील हजारो वैदर्भीय नवी मुंबईत राहत आहेत. मात्र, त्यांची प्रभावी संघटना नसल्याने वैदर्भियांचे सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रम या परिसरात होत नाहीत. त्यामुळे आपल्या गावांपासून खूप दूर आलेल्या मराठी माणसांना आपली बोली भाषा, आपल्या खाद्य आणि जीवनशैलींवर आधारित समारंभांची उणीव सतत भासत असते. सदरची उणीव दूर करण्यासाठी या परिसरातील वैदर्भियांनी एकत्र येऊन आपला विदर्भ संघटना स्थापन केली आहे.

रायगड जिल्हा आणि नवी मुंबई क्षेत्रात राहणाऱ्या तसेच प्रशासनासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अथवा व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना एकत्र आणण्यासाठी, वैदर्भीय संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आपला विदर्भ या संघटनेची स्थापना केली आहे. वैदर्भियांना मदत करणे आणि भविष्यात नवी मुंबईत विदर्भ भवन उभारण्याचा संकल्पही आम्ही केला आहे, असे ‘संघटना'चे मुख्य समन्वयक ॲड. विजयकुमार कोहाड यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. प्रमोद चुंचूवार यांनी वैदर्भियांनी एकत्र येण्याची गरज असून आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा, असे स्पष्ट प्रतिपादन केले.

यावेळी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करुन आयआरएस झालेले आणि सध्या मुंबईत नियुक्त नितीश पाथोडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ‘महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस'च्या सचिव जयश्री शेळके, माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके, पत्रकार महेंद्र सुके यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि उखाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. तसेच मुले-मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अश्विनी हडपे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वैशाली चुंचूवार यांनी सभागृहात केलेली सजावट आणि काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. कार्यक्रमात आभार किशोर गुल्हाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल नहाते, राजेंद्र नंदनकर,श्यामा कोहाड, अनुराधा रंगारी, प्रशांत कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती' तर्फे पहिल्यांदाच कार्ला लेण्यांवर प्रजासत्ताक दिन साजरा