विमानतळ प्रकल्पावरील स्फोटांनी हादरल्या बेलापूरच्या इमारती

 नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्माण स्थळावर होणाऱ्या उच्च तीव्रतेच्या स्फोटांमुळे सीबीडी-बेलापूर मधील इमारतींना मोठ्या भेगा पडल्याची बाब पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

यासंदर्भात ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने केलेल्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नागरी विमान वाहतूक विभागाला या विषयावर चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीडी-बेलापूर, सेक्टर-११ आणि  सेक्टर-१५ तसेच सीवुडस्‌ एनआरआय कॉम्प्लेक्सच्या काही रहिवाशांनी ‘नॅटकनेवट'कडे हादरे आणि इमारतींना पडणाऱ्या मोठमोठ्या भेगांच्या त्रासाबद्दल तक्रार केली होती.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्थळाच्या उत्तरेकडे खाडी पलिकडील दूरवर्ती भागांवर विस्फोटांचा परिणाम होण्याची बाब अतिशय धक्कादायक आहे. यामुळे इमारतींना भेगा पडत असून नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न होत आहे, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार म्हणाले. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सदर बाब गांभिर्याने घेणे क्रमप्राप्त आहे. सीबीडी-बेलापूर अतिशय गजबजलेले नोड असून येथे इमारतींमध्ये जेष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुले राहतात. त्यांना देखील याचा अतिशय त्रास होत आहे. आमच्या निवेदनाची गांभिर्याने दखल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरी विमान वाहतूक विभागाच्या प्रमुख सचिव वल्सा नायर सिंग यांना ई-मेल द्वारे सूचना केली असल्याचे बी. एन. कुमार यांनी सांगितले.

पर्यावरणप्रेमी शिल्पा शेट्टी यांच्या शेजारच्या इमारतींवर देखील गंभीर परिणाम झाला असून तेथे खिडकीच्या काचा फुटून त्या रहिवाशांच्या अंगावर पडण्याची भिती वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. तर विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी होणाऱ्या स्फोटांमुळे आमच्या खिडक्या आणि फर्निचर खिळखिळे झाले आहे. परिसरात प्रचंड धुराळा झाला असून, हवा देखील प्रचंड प्रमाणात खराब झाली आहे. सदरची परिस्थिती जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी अतिशय त्रासदायक असल्याचे सीबीडी, सेवटर-१५ मध्ये राहणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्या शुभांगी तिरोडकर यांनी सांगितले. सीवुडस्‌ एनआरआय काम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या व्यावसायिक संजय राममूर्थी यांनी देखील अत्युच्च हादऱ्यांची आणि त्यांच्या घराच्या भिंती भयंकर हलण्याची तक्रार केली आहे.

विमानतळ प्रकल्पावरील स्फोटांमुळे इमारतींच्या संरचनांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्फोटाने प्रभावीत इमारतींचे सिव्हील इंजिनिअर्सकडून स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याची जवाबदारी शासनाने घ्यायला हवी, अशी मागणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. -बी.एन.कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

सीबीडी, सेक्टर-११ मधील अरेंजा टॉवर्स सोसायटीतील सोसायटीत इमारतीमध्ये खिडक्यांच्या कडांना, भिंती आणि अगदी खांबांना देखील या उच्च तीव्रतेच्या स्फोटांमुळे भेगा पडल्या आहेत. सुरुवातीला स्फोटांची तीव्रता सहन करण्यासारखी होती. पण, आता केवळ तीव्रताच नव्हे तर वारंवारता देखील वाढली आहे. आमच्या सोसायटीचे सभासद खिडक्या खिळखिळ्या होण्याची, भिंतींवरच्या भेगा वाढण्याची तसेच फरशीच्या टाईल्सना भेगा पडण्याची, प्लास्टर निखळण्यासारख्या अनेक प्रकारांची तक्रार करीत आहेत. - रोहित अग्रवाल, सचिव-अरेंजा टॉवर, सेवटर-११, सीबीडी.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ऐरोली-मुलुंड उड्डाणपुलावरील वाहतुकीत बदल