‘सिडको'च्या निकृष्ट इमारतीच्या पुनर्निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर

सीवुडस्‌ येथील घराचा स्लॅब कोसळला

नवी मुंबई ः सीवुडस्‌ येथील सिडको निर्मित इमारतीच्या घरांची पडझड सुरुच आहे. सेक्टर-४८ मधील ज्ञानेश्वर माऊली सोसायटी बी-१३/१३ येथे राहणाऱ्या मंगेश कावले यांच्या घरातील किचनचे प्लास्टर २० जानेवारी रोजी सकाळी अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक नागरिक भयभीत आहेत. दरम्यान, मागील पावसाळ्यापासून सीवुडस्‌ मधील सिडको निर्मित सोसायटी मधील घरांच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळण्याची सदर १५वी घटना आहे. त्यामुळे ‘सिडको'ने पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी ‘सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकाकडे केली आहे . सीवुडस्‌ मधील सेक्टर-४८ ,४८ए आणि ४६ मध्ये एकूण ३२ सिडको निर्मित गृहनिर्माण सोसायट्या असून त्यात सुमारे ४ हजार सदनिका आहेत. गेल्या १०-१२ वर्षांपासून येथील घरांच्या स्लॅबचे प्लास्टर वारंवार कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. परिणामी, ‘सिडको'च्या निकृष्ट इमारतीच्या पुनर्निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी सिडको दुर्घटनाग्रस्त घरांच्या दुरुस्तीचे काम करत होती. मात्र, मागील वर्षभरापासून आमची मुदत संपली असल्याचे कारण पुढे करत दुरुस्तीचे काम करत नव्हती. गतवर्षी पावसाळ्यात ६ जुलै२०२२ रोजी सीवुडस्‌ मधील दोन सोसायटीतील घरांच्या स्लॅबचे कोसळल्याची दुर्घटना घडली. तेव्हापासून अशा दुर्घटना घडतच असून पुन्हा १५ वी घटना सीवुडस्‌-सेक्टर ४८ मधील ज्ञानेश्वर माऊली सोसायटीत बी-१३/१३ येथे घडली. २० जानेवारी रोजी सकाळी सदर घरात राहणारे मंगेश कावले यांच्या घरातील किचनच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले. यावेळी सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ‘सिडको'च्या निकृष्ठ बांधकामामुळे घराचा स्लॅब कोसळणे, भिंतींना तडे जाणे, प्लास्टर कोसळने अशा घटना मागील १० वर्षांपासून नित्याच्याच झाल्या आहेत. त्यावेळी तत्कालीन स्थानिक लोकप्रतिनिधींनी ‘सिडको'च्या विरोधात आवाज उठवल्याने दुर्घटना झालेल्या सदनिकेची दुरुस्ती ‘सिडको'च्या अभियंता विभागाकडून केले जात होते. मात्र, सदनिकांच्या दुरुस्तीचे काम वर्षभरापासून बंद असल्याने नागरिकांमध्ये सिडको विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी ‘सिडको'च्या अभियंता विभागाकडे पत्रव्यवहार करुन बंद असलेली ‘सिडको'च्या घरांच्या दुरुस्तीची कामे पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. त्याअनुषंगाने १० नोव्हेंबर २०२२ पासून ‘सिडको'ने स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत सदनिका दुरुस्तीची कामे पुन्हा सुरू केली असून ज्ञानेश्वर माऊली मधील पडझड झालेल्या सदनिकेची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘सिडको'तर्फे खारघर हिल्स वर अनधिकृत खोदकाम