मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन

 ‘कविता डॉट कॉम'द्वारे उजळल्या काव्यज्योती

नवी मुंबई ः ‘केरकचरा आता विसरा सारा, स्वच्छतेचा एकच घुमतो नारा, लाखो मनांनी ठरविली स्वच्छता, करु नवी मुंबई सुंदर आता' अशा काव्यओळी गाऊन युवाकवी रुद्राक्ष पातारे यांनी सुरेल सुरुवात केलेल्या ‘कविता डॉट कॉम' या काव्य मैफिलीला रसिकांची प्रचंड दाद मिळाली.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये नवी मुंबईकर कवी प्रा. रवींद्र पाटील, जितेंद्र लाड, वैभव वऱ्हाडी, शंकर गोपाळे, नारायण लांडगे पाटील, रुद्राक्ष पातारे आणि महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड या सात कवींनी महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात ‘संवाद नात्याचा-कविता डॉट कॉम' सादर करीत रसिकांची प्रचंड दाद मिळविली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे आणि सुजाता ढोले, समाजविकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, विधी अधिकारी अभय जाधव तसेच ज्येष्ठ गजलकार आप्पा ठाकूर यांच्या शुभहस्ते सहभागी कवींचा सन्मान करण्यात आला शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘अनाम वीरा' या कवितेचे सुरेल गायन करुन या मैफिलीचा प्रारंभ केला. त्यानंतर कवी रुद्राक्ष पातारे यांची ‘स्वच्छ नवी मुंबई, आमची नवी मुंबई' कविता रसिकांना प्रचंड भावली.

गझलकार तथा महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी ‘जी विजेचा लोळ नाही, ती गझलची ओळ नाही' असे म्हणत, ‘किती जरी तू लांबवशील कैलास वेळ जाण्याची, काळ गळ्याभोवतील दोरी सतत आवळत जातो' असा अखेरचा शेर असणारी गझल सादर करीत वातावरण भारून टाकले.

कवी वैभव वऱ्हाडी यांनी ‘सोबत होती वेळ आणि वय, वेळ सरत होती अन्‌वय वाढत होतं' या विचारप्रवर्तक कवितेने मनाचा ठाव घ्ोतला. कवी शंकर गोपाळे ‘बाप नावाचा माणूस, न उलगडलेलं कोडं' म्हणत बापाची महती गाऊन सादर केली. शिवव्याख्याते कवी प्रा. रवींद्र पाटील यांनी ‘शिका, वाचा, जिंका' असा शिवाजी या नावाचा नवीन अर्थ उलगडत छत्रपती शिवाजी महाराज यांची महती सांगितली. डॉ. वि्ील शिंदे लिखित ‘राजे' कविता त्यांनी दमदारपणे सादर केली. कवी जितेंद्र लाड यांनी ‘आपण कृतज्ञतेचे वारसदार आहोत' असे म्हणत, ‘माझ्या जगण्याचं बळ, तुझ्या डोळ्यांची करुणा, लाख दिव्यांचा महाल, आई तुझ्याविना सुना' असे म्हणत आईची महती सुरेल आवाजात गाऊन सादर केली. कवी नारायण लांडगे पाटील यांनी या संपूर्ण काव्य मैफिलीचे दिलखुलास सूत्रसंचालन करीत ‘माय मराठी' अशी स्वरचित कविता सादर करुन मराठीचे महत्त्व विशद केले. प्रसाद माळी या इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलाने ‘बकुळा' कविता गाऊन सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. सादरीकरणाच्या दुसऱ्या सत्रातही अनेक अप्रतिम कविता सादर करीत या काव्यसप्तकाने रसिकांना बांधून ठेवले.

दरम्यान, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये २४ जानेवारी रोजी सायं. ४ वाजता महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात सुप्रसिद्ध साहित्यिक, कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वष्राानिमित्त ‘जी ए ः स्मरणखुणा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रा. वृषाली मगदूम, डॉ. मृण्मयी भजक आणि मीनाक्षी पाटील या जीए कुलकर्णी यांच्या आठवणींचा आणि अभिजात साहित्याचा मागोवा घेत काही साहित्यकृतींचे अभिवाचन करणार आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'च्या निकृष्ट इमारतीच्या पुनर्निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर