पायाभूत सर्वेक्षण सोबतच महापालिका क्षेत्राचा बेसमॅप अद्ययावत

 ‘लिडार'द्वारे मालमत्ता सर्वेक्षण कार्यवाहीला जलद पूर्ण करा -राजेश नार्वेकर

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्तांच्या लिडार तंत्रज्ञानद्वारे सुरु असलेल्या सर्वेक्षण कामाला गती देऊन सर्वेक्षण पूर्ण झालेल्या मालमत्तांची माहिती मालमत्ता कर विभागाकडे त्वरित हस्तांतरीत करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित एजन्सीला दिले. तसेच सदरची कार्यवाही तत्परतेने करुन घेण्यासाठी अभियांत्रिकी विद्युत विभागाने सतर्क रहावे. मालमत्ता कर विभागानेही माहिती लवकरात लवकर उपलब्ध करुन घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा स्पष्ट सूचना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिल्या आहेत.

लिडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेताना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सिडको विकसित नागरी क्षेत्र, गांवठाण, झोपडपट्टी अशा भागांप्रमाणेच एमआयडीसी क्षेत्रातील सर्वेक्षण कार्यवाहीचा बारकाईने आढावा घेतला. या सर्वेक्षणात ३६० डिग्रीमध्ये विस्तीर्ण सर्वेक्षण होत असून मोबाईल मॅपींग सिस्टीम वापरुन पायाभूत पातळीवर प्रतिमा संपादित केली जात आहे. या पायाभूत सर्वेक्षण सोबतच महापालिका क्षेत्राचा बेसमॅप अद्ययावत केला जात असून इन्टीग्रेशनही केले जात आहे. ड्रोनद्वारे सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष जागी जाऊन सर्वेक्षण अशा दोन्ही प्रकारे सर्वेक्षण होत असल्याने यामध्ये जास्तीत जास्त अचूकता असावी याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता सुनिल लाड, संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्राची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांमध्ये देखील वाढ तसेच बदल झालेले आहेत. लिडार सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन होणाऱ्या सर्वेक्षण द्वारे जास्तीत जास्त अचूक माहिती महापालिकेला प्राप्त होणार असून महापालिका क्षेत्रातील मालमत्तांच्या सद्यस्थितीची अद्ययावत माहिती महापालिका कडे उपलब्ध होणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१९ जानेवारी नवी मुंबईत हवा गुणवत्तेचा निर्देशांक सर्वाधिक ३९३ नोंद