भविष्यात अपंग आणि ज्येष्ठ नागरिक यांचा रेल्वे प्रवास सुकर करण्यास ‘सिडको'कडून दिरंगाई

वाशी रेल्वे स्थानकात अपंगांसाठी रॅम्प जिना करण्याची मागणी

नवी मुंबई ः वाशी रेल्वे स्थानकात अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांकरिता रॅम्प जिना किंवा एस्केलेटर उभारण्यात यावे, अशी मागणी ‘मनसे'चे वाशी विभाग अध्यक्ष सागर विचारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ‘सिडको'कडे निवेदनातून केली आहे. तसेच भविष्यात अपंग आणि ज्येष्ठ नागरिक यांचा रेल्वे प्रवास सुकर करण्यास ‘सिडको'कडून दिरंगाई झाल्यास अपंगांसमवेत ‘मनसे'तर्फे आंदोलन करण्याचा इशारा देखील सदर निवेदनातून देण्यात आला आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील मुख्य स्थानकांपैकी एक म्हणून वाशी रेल्वे स्थानक ओळखले जाते. वाशी रेल्वे स्थानक सीएसएमटी आणि ठाणे येथे जाणाऱ्या गाड्यांचे टर्मिनल पॉईंट असून, वाशी ते मुंबई सीएसएमटी आणि पनवेलच्या दिशेने दररोज हजारो प्रवासी कामानिमित्त प्रवास करतात. त्यात शेकडो अपंग आणि ज्येष्ठ नागरिक देखील प्रवास करतात. अशावेळी रॅम्प जिना किंवा एस्कलेटर नसल्याकारणाने अपंगांना आणि ज्येष्ठ नागरिकांना फलाटावर ये-जा करणे अत्यंत जिकरीचे बनले आहे. रेल्वे स्थानकात शिरल्यानंतर फलाटावर पोहोचण्याकरिता चढ-उताराच्या मिळून एकूण ४८ पायऱ्या आहेत. मुळातच वाशी रेल्वे स्थानकाची निर्मिती करताना अपंग बांधवांचा विचार करणे गरजेचे होते. ‘सिडको'ने या स्थानकाला भव्य रुप दिले. परंतु, गरजेच्या गोष्टींना मात्र टाळले असल्याचा आरोप ‘मनसे'चे वाशी विभाग अध्यक्ष सागर विचारे यांनी ‘सिडको'च्या कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

‘सिडको'ने लवकरात लवकर वाशी मधील रेल्वे स्थानकात अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांकरिता रॅम्प जिना किंवा एस्केलेटर उभारण्याची मागणी ‘मनसे'ने केली आहे. तसेच अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांचा रेल्वे प्रवास सुकर होण्यास दिरंगाई झाल्यास अपगांसोबत आंदोलन करण्याचा इशाराही ‘मनसे'तर्फे सदर निवेदनातून देण्यात आला आहे.

दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यातील तांत्रिक बाबी तपासून कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन ‘सिडको'च्या कार्यकारी अभियंत्यांनी ‘मनसे'च्या शिष्टमंडळाला दिले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहरात प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी