संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय स्पर्धा संपन्न
‘एनआरबी ट्रस्ट'तर्फे बालकांच्या विविध स्पर्धांचे आयोजन
नवी मुंबई ः जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि विद्यादान हेच श्रेष्ठदान या यविचाराने कार्यरत असणाऱ्या एन.आर.बी. एज्युकेशनल सोशल आणि कल्चरल ट्रस्ट नेरुळ शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी सिडको प्रकल्पग्रस्तांनी चालवलेली सेवाभावी शैक्षणिक संस्था आहे. २३ जानेवारी १९९१ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेचा यंदा ३२ वा वर्धापन दिन आहे. स्थापना दिनाचे औचित्य साधून ‘एनआरबी ट्रस्ट'तर्फे पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शिशू वर्गातील बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी नेरुळ, सेवटर-१२ मधील श्री गणेश रामलीला मैदानावर संपन्न झालेल्या या स्पर्धांमध्ये मोठ्या शिशू वर्गासाठी चित्रकला स्पर्धा, अभिनय गीत, कथाकथन, वेशभूषा, श्लोक पाठांतर, लोकनृत्य स्पर्धा यांचा समावेश होता. तर छोटा शिशू वर्गासाठी चित्रकला, बडबड गीत आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे नर्सरी विभागासाठी देखील वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांमध्ये अनेक अंगणवाडी, बालवाडी आणि केजी वर्गतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना ३ हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र, ट्रॉफी तर द्वितीय क्रमांक पटकावलेल्या विजेत्या बालकांना २ हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र, ट्रॉफी तर तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र, ट्रॉफी देण्यात आली.
चित्रकला स्पर्धेत (मोठा शिशू) स्वरा राजेश वाघमारे (तेरणा विद्यालय), छोटा शिशू-शायान आवटे (एनआरबी एज्यु. ट्रस्ट), वेशभूषा स्पर्धा-नर्सरी ओवी घेवडे (ओम सद्गुरु अंगणवाडी), मोठा शिशू-मानवीश सुक्रे (विद्याभवनइंग्रजी माध्यम), अभिनय गीत-ऋतुजा वाडेकर (एनआरबी एज्यु. ट्रस्ट), चित्रकला स्पर्धा-सुदीप गुचेत (एस.एस.हायस्कुल), समूह नृत्य स्पर्धा-विद्याभवन सेमी इंग्रजी यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
सदर स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष नामदेव भगत, माजी नगरसेविका सौ. इंदुमती भगत, संस्थेचे खजिनदार अशोक पाटील, मोहनलाल तेली, डॉ. सोनम भगत, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कोठेकर, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप खिस्ते, राजेंद्र पिंगळे, भाऊसाहेब आव्हाड, पूर्वा ठाकरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील, काळुराम जाधव, वृशाली परदेशी, सुनंदा नौकुडकर, सुनिता वीर, सुगंधा घुले, निराशा मोकल यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमात प्रास्ताविक शिक्षक शेखर जगताप यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. वृषाली परदेशी आणि सौ. रेणुका मॅडम यांनी केले.