महापालिका तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा शुभारंभ

मराठी भाषा संवर्धनासाठी महापालिका कटीबध्द -राजेश नार्वेकर

नवी मुंबई ः आपल्या मराठी घरातील मुले रोजगार, व्यवसायानिमित्त संपूर्ण जगभरात विविध देशांमध्ये जात असून त्यांच्या माध्यमातून तिथेही मराठी संस्कृतीची मुळे रुजत आहेत. सदर बाब आपल्या दृष्टीने अभिमानाची असल्याचे सांगतानाच लंडनमधील गणेशोत्सवाचे आणि इतर उत्सवांचे अनुभव कथन करीत परदेशातही मराठीचा गौरव होत असल्याचा सुप्रसिध्द कवी अशोक नायगावकर यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, आज आपल्याकडे घरातील तिसऱ्या पिढीला तुम्ही बोललेल्या अनेक मराठी शब्दांचा अर्थ कळत नाही असे घराघरातील चित्र असले तरी त्यांच्याशी आवर्जुन मराठीत बोलून आपण आपले भाषा संवर्धन करीत राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने १४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत साजरा करण्यात येत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा शुभारंभप्रसंगी महापालिका मुख्यालयातील ॲम्पीथिएटर येथे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी अशोक नायगावकर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच रसिकांशी दिलखुलास संवाद साधला.

नुकत्याच झालेल्या अशोक नायगांवकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्यांचा विशेष सन्मान करीत त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अशोक नायगावकर यांच्या पत्नी शोभना नायगावकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि संजय काकडे याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

नवी मुंबई स्वच्छतेमध्ये देशातील नेहमी अग्रभागी असणारे शहर असून येथील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे अनुकरण इतरही शहरांनी करायला हवे असे आहे. आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ राहिला तर आपली मनेही आपोआप स्वच्छ राहतात. महापालिकेच्या भव्य मुख्यालयातील ॲम्पीथिएटरमध्ये कार्यक्रम करायला येताना मला ग्रीक, रोमन व्यासपीठांवर जाण्याचा भास होत आहे. नवी मुंबईचे काम उत्कृष्ट असून मागील वर्षी कवी संमेलनात एखाद्या शहरात जाता येता लोकांच्या नजरेला कवितेच्या चांगल्या ओळी पडाव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती, ती नवी मुंबईने लगेच पूर्ण केली. यामधून शहरातील सांस्कृतिक वातावरण विकासासाठी नवी मुंबई महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांचे अशोक नायगांवकर यांनी कौतुक केले.

मायबोली मराठी या विषयावर उपस्थितांशी सुसंवाद साधताना सुरुवातीला समुहाने मराठीचा पाठ म्हणवून घ्ोत अशोक नायगावकर यांनी मराठी भाषेला लवकरच अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर आपल्या प्रसिध्द कविता सादर करताना त्यामधील खुसखुशीत आणि मार्मिक भाष्याने त्यांनी वातावरण हसते खेळते ठेवले. महिलांची लक्षणीय उपस्थिती लक्षात घेत कवी नायगांवकर यांनी कौटुंबिक कवितांवर भर दिला. तसेच स्त्रियांच्या दोन पिढ्यांतील फरक सांगत मागील १०० वर्षात महिलांच्या कर्तृत्वात कितीतरी पटीने वाढ झाल्याचे सांगितले. यामागे असलेल्या महनीय व्यक्तींच्या त्यागपूर्ण जीवनाचे आपण स्मरण ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय स्पर्धा संपन्न