नियोजनबध्द शहरात सुनियोजित वाहतूक व्यवस्थाही महत्वाची -राजेश नार्वेकर

वाहतूक विभागातर्फे आयोजित ‘रस्ता सुरक्षा सप्ताह'चा समारोप

नवी मुंबई ः नवी मुंबई शहर नियोजनबध्द शहर असून या शहरातील वाहतुकीची व्यवस्था देखील त्याच पध्दतीने सुनियोजित असली पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन अधिक चांगले शहर कसे करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले.  

नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे आयोजित ‘रस्ता सुरक्षा सप्ताह'चा समारोप १७ जानेवारी रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी आयुक्त नार्वेकर बोलत होते. याप्रसंगी ‘नवी मुंबई'चे सह-पोलीस आयुक्त संजय मोहिते, परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) तिरुपती काकडे तसेच उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, आदि उपस्थित होते. या कार्यक्रमात अभिनेते स्वप्निल जोशी यांच्या उपस्थितीने रंगत आली.  

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून गोवा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण भारतात जाण्यासाठी नवी मुंबईतून जावे लागते. त्यामुळे नवी मुंबई शहरात नेहमीच वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या शहरात वाहतुकीच्या दृष्टीने उद्‌भवणाऱ्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांना महापालका सर्वतोपरी मदत करणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.  

यावेळी सह-पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह फक्त काही दिवसांसाठी नसून ते कायम सुरु राहणारे कार्य आहे. समाजातील प्रत्येक घटकाचे सहकार्य या कामात महत्वाचे आहे. अन्यथा अभियान यशस्वी होणार नाही. त्यामुळे आपल्याला अपघात मुक्त शहर करण्याचे लक्ष ठेवून सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच नियम तोडणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसूल करुन त्यांना त्रास देणे पोलिसांचा उद्देश नसून त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी कारवाई केली जात असल्याचे मोहिते यांनी यावेळी स्पष्ट केले.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये वाहतूक विभागाकडून ‘रस्ता सुरक्षा सप्ताह'मध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृतीचे उपक्रम या सप्ताह पुरते मर्यादित न राहता ते वर्षभर चालू राहतील. तसेच यामध्ये नागरिकांनी सक्रियरित्या सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी जादुच्या प्रयोगाचा कार्यक्रम देखील आयोजन करण्यात आला होता.  

आम्ही दोन-अडीच तासाचे स्क्रीनवरचे तर पोलीस ३६५ दिवस खऱ्या आयुष्यातील हिरो...
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी यांनी आपल्या मनोगतात, पोलीस कुठलीही दाद मिळविण्याच्या अपेक्षेने काम न करता वर्षानुवर्षे देशाची अविरत, दिवसरात्र सेवा करत असतात. आम्ही फक्त दोन-अडीच तासाचे स्क्रीनवरचे हिरो आहोत. मात्र, पोलीस २४ तास ३६५ दिवस खऱ्या आयुष्यातील हिरो असतात. आमच्या सारखे हिरो होणे कठीण आहे. मात्र, तुमच्या सारखे हिरो होणे अशक्य असल्याचे सांगितले. कायदे आणि नियम पाळण्याची जबाबदारी फक्त पोलीस, समाजव्यवस्था अथवा सरकारची नसून नागरिक म्हणून प्रत्येकाची ती जाबबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या परीने या नियमांचे पालन करणे गरजचे असल्याचे स्वप्निल जोशी यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा शुभारंभ