रोजच्या वायू प्रदूषणामुळे वाशी परिसरातील नागरिक भयभीत

एमआयडीसी मधील रासायनिक कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूष

वाशी ः वातावरणात सध्या गारठा पडला आहे. त्याचा फायदा घेत एमआयडीसी मधील रासायनिक कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्रदूषित वायू सोडला जात आहे. मात्र, सदर वायूमुळे परिसरात धुके दाटत असून, मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत आहे. तसेच श्वास घेण्यास देखील अडचणी येत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याने अजून किती दिवस मृत्यूच्या सावटाखाली झोपावे लागणार आहे?, असा सवाल कोपरी, सेक्टर-२६ येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

३ डिसेंबर १९८४ या दिवशी मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ शहरात मोठी गॅस दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेतील गॅस गळतीमुळे जवळपास २०,००० लोकांचा या दुर्घटनेशी निगडित आजारांमुळे मृत्यू ओढवला तर ५,००,००० पेक्षा जास्त नागरिक जखमी, अपंग झाले होते. त्यामुळे भोपाळ सारखी गॅस दुर्घटना नवी मुंबई शहरात घडण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळ वाट पाहत आहे का?, असा सवाल आता वाशी, कोपरी विभागातील नागरिक करीत आहेत. एमआयडीसी मधील कारखानदारांकडून रोज रासायनिक, प्रदूषित वायू सोडले जात आहेत. मागील एक आठवडा पडत असलेल्या थंडीचा, धुक्याचा गैरफायदा घेऊन रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणात प्रदूषित वायू सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मागील एक आठवडा वाशी विभागातील हवा गुणवत्ता खालावली असून ती रोज ३०० पार जाते. सदर हवा आरोग्यास अतिशय खराब असल्याचे तज्ञांचे मत आहे. तर कोपरी सेक्टर-२६ भागात रात्री प्रदूषित हवेच्या दर्पवासाने नागरिकांना मळमळ झाल्यासारखे आणि श्वास घेण्यास अडचण वाटत होते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने रात्री प्रदूषित हवा सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दुर्लक्षित घटकांना समाजात मानाचे स्थान मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज