दुर्लक्षित घटकांना समाजात मानाचे स्थान मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज

 

पिंक बुकचे जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते प्रकाशन

ठाणे ः अनैतिक मानवी वाहतुकीमध्ये सापडलेले पिडीत, कठीण परिस्थितीतून गेलेल्या महिला, अनाथ बालके तसेच ज्येष्ठ नागरिक, कामगार यासह सर्वच दुर्लक्षित घटकांना समाजात मानाचे स्थान मिळावे आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची ग्वाही समाजाला देऊ, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

महिला-बालविकास विभाग आणि यु कॅन फ्री अस इंडिया संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी शिनगारे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. ईश्वर सुर्यवंशी, जिल्हा महिला-बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, बाल कल्याण समिती अध्यक्ष राणी बैसाने, बाल न्याय मंडळाच्या सदस्य शिल्पा नेलवाडकर, स्वाती रणदिवे, बाल कल्याण समिती सदस्य अर्चना कऱ्हाडे, मनिषा झेंडे, पोखरकर, यु कॅन फ्री अस इंडियाच्या संस्थापक सुजॉय जॉन, मुख्य कार्यकारी अधिकारी शितल कलांजली, स्वाती सिंग, जिल्हा तपासणी समितीचे सदस्य डॉ. सुधीर सावंत, आदि उपस्थित होते. यावेळी सुजॉय जॉन यांनी लिहिलेल्या पिंक बुक-अ लाईफ स्किल्स रिसोर्स या पुस्तिकेचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

गेल्या दोन दिवसांपूर्वी अनाथ बालकांना पालक मिळवू देण्याचे काम करु शकलो याचा मनस्वी आनंद आहे. आयुष्यातील माझ्या सेवेतील सदर अत्युच्च क्षणापैकीचा एक क्षण होता. आज समाजातील उपेक्षित, कठीण परिस्थितीतून गेलेल्या आणि मानसिक कुचंबनेतून बाहेर येऊन सर्वसामान्यांचे जीवन जगण्याचा प्रयत्न करण्यासाठी काम होत आहे, याचा आनंद होत आहे. महिलांच्या कौटुंबिक हिंसाचार, अनैतिक मानवी वाहतूक यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला नसल्याची वस्तुस्थिती आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले.

समाजातील दुर्बल घटक, महिला आणि बालकांच्या सबलीकरणातून समाज घडविण्याचे काम करताना मिळणारे आत्मिक समाधान इतर कुठल्याही गोष्टीतून मिळत नाही. महिला अत्याचाराबरोबरच पोक्सो कायद्याविषयी समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत यासंदर्भात विशेष उपक्रम राबविण्यात यावे. दुर्बल घटकांना कायदेविषयक सहाय्य करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण काम करत आहे. तसेच अत्याचार पिडीतांसाठी मनोधैर्य योजनेद्वारे मदत दिली जाते. यांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, अशी सूचना न्यायाधीश सुर्यवंशी यांनी यावेळी केली.

बाल कल्याण क्षेत्रात काम करताना अनेक आव्हाने येत असतात. बालकांशी संवाद साधताना त्यांचे वय, त्यांची मानसिकता, संगोपन, परिसरातील वातावरण याचा अभ्यास करावा लागतो. अशा परिस्थितीत पिंक बुक पुस्तक या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष राणी बैसाने यांनी व्यवत केला.

यावेळी मान्यवरांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बाल न्याय मंडळाच्या सदस्य स्वाती रणदिवे, गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. यु कॅन फ्री अस इंडियाच्या रुपा दास यांनी आभार मानले. बाल न्याय नियमानुसार ठेवण्यात येणाऱ्या कागदपत्रासंदर्भात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी शिरसाट यांनी स्वयंसेवी संस्थांना माहिती दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नियोजनबध्द शहरात सुनियोजित वाहतूक व्यवस्थाही महत्वाची -राजेश नार्वेकर