पामबीच मार्गावरील भुयारी मार्गासाठी २२४ झाडांवर कुऱ्हाड

सानपाडा येथील भुयारी मार्गासाठी १९२ झाडांवर कुऱ्हाड पडणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त

वाशी ः पामबीच मार्गावरील वाशी कोपरी उड्डाणपुलाच्या कामात ३९० झाडे बाधीत होणार असताना आता याच मार्गावर सानपाडा येथील भुयारी मार्गात २२४ झाडे बाधीत होत आहेत. मात्र, सदर झाडांपैकी १९२ झाडे सरसकट तोडली जाणार आहेत.त्यामुळे भुयारी मार्गासाठी १९२ झाडांवर कुऱ्हाड पडणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

 नवी मुंबई शहराचा रत्नहार म्हणून पामबीच मार्गाची आज ओळख आहे.त्यामुळे या रस्तावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावरील वाहतुकीला अधिक गती मिळावी म्हणून नवी मुंबई महापालिका तर्फे कोपरी गाव येथे ३५१ कोटी रुपये खर्च करुन उड्डाणपूल आणि सानपाडा येथे २५ कोटी रुपये खर्च करुन भुयारी मार्ग बनविण्यात येणार आहे. कोपरी उड्डाणपुलात ३९० झाडे बाधीत होणार असून,  त्यातील ३८४ झाडे स्थलांतरित आणि ६ झाडे तोडली जाणार आहेत. मात्र, सानपाडा भुयारी मार्गात २२४ झाडांपैकी तब्बल १९२ झाडे सरसकट तोडली जाणार आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जाणार असल्याने पर्यावरण प्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत.
एक महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी

कोपरी उड्डाणपुलात ३९० झाडे बाधीत होणार होती म्हणून यावर हरकती नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढवण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. सदर मागणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने मान्य केल्यानंतर १००९ नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत.त्यामुळे या प्रस्तावास नवीन जाहिरात राबवून एक महिन्याची मुदत हरकती नोंदविण्यासाठी द्यावी, अशी मागणी ‘पर्यावरण सेवा भावी संस्था'चे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांन केली आहे.
---------------------------------------
लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

पामबीच मार्गावरील कोपरी उड्डाणपुलात ३९० झाडे बाधीत होणार होती. यास स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरुन कडाडून विरोध केला होता. आता पामबीच मार्गावरील सानपाडा येथील प्रस्तावित भुयारी मार्गात २२४ झाडांचा बळी जाणार आहे. त्यामुळे सदर २२४ झाडे वाचवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी काय भूमिका घ्ोतात याकडे नवी मुंबईकरांच्या नजरा लागल्या आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कमी विशेषाधिकार असलेल्या शाळांसाठी १०० डेस्कसाठी पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम