नवी मुंबईत ५६ फुटाची भव्य रांगोळी

नवी मुंबई ः जी ट्‌वेन्टी राष्ट्रगटाच्या ‘शिखर परिषद'च्या यजमानपदाचा मान यावर्षी २०२३ साठी भारताला मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या राष्ट्रगटाच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाले आहेत. या ‘शिखर परिषद'च्या स्वागतासाठी नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर ५६ फुट आकाराची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. या भव्य रांगोळीमध्ये जी-२० राष्ट्रगटाचा २०२३ सालासाठीचा नवीन लोगो
चित्रीत करण्यात आला आहे. सदर भव्य भव्य रांगोळी प्रदर्शित करते वेळी संदीप नाईक, ‘भाजपा'चे महामंत्री संजय उपाध्याय, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, सागर नाईक, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका सौ. माधुरी सुतार, माजी नगरसेविका ॲड. अपर्णा गवते यांच्यासह ‘भाजपा'च्या युवा, महिला मोर्चा आणि अन्य आघाडीचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांची जी ट्‌वेन्टी राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदी झालेली निवड भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगून संदीप नाईक यांनी पंतप्रधान मोदी यांची विकासात्मक धोरणे आणि या धोरणांची यशस्वी अंमलबजावणी यांची दखल जागतिक पातळीवर वेळोवेळी सन्मानपूर्वक घेण्यात आलेली आहे, असे सांगितले. जागतिक आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी १९९९ मध्ये या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली. भारतासह अमेरिका, रशिया या महासत्ता त्यांच्याबरोबरच ब्रिटन, फ्रान्स, चीन, जपान, इटली, सौदी अरेबिया, जर्मनी, तुर्की, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, दक्षिण कोरिया असे विकसित आणि विकसनशील देश जी ट्‌वेन्टी राष्ट्रगटाचे सदस्य आहेत जी ट्‌वेन्टी राष्ट्रगटाची शिखर परिषद ९ सप्टेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे होणार आहे. त्यापूर्वी भारतातील विविध ५० शहरांमध्ये राष्ट्रगटाच्या २०० पेक्षा अधिक बैठका पार पडणार आहेत. या बैठकांमधून भारतात उद्योग, व्यापार, पर्यटन यांना चालना मिळून रोजगार, नोकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढणार आहे, अशी माहिती संदीप नाईक यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांना जी ट्‌वेन्टी राष्ट्रगटाचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे संपूर्ण देशात उत्साह असून भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे. खासकरुन कोरोनामुळे निर्माण झालेल्या जागतिक मंदीमध्ये देखील भारताला फारशी झळ लागली नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा परिणाम आहे, असे संदीप नाईक म्हणाले.

नवी मुंबईमध्ये युवक, युवती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था सर्व घटक जी ट्‌वेन्टीच्या स्वागत कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. भारतात होणाऱ्या जी ट्‌वेन्टी राष्ट्रगटाच्या प्रतिष्ठित परिषद बाबत आणि तिचे महत्त्व जनतेला अवगत करुन देण्याचे आवाहन संदीप नाईक यांनी उपस्थितांना यावेळी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पामबीच मार्गावरील भुयारी मार्गासाठी २२४ झाडांवर कुऱ्हाड