मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कोकण भवन येथे पुस्तक प्रदर्शन

 नवी मुंबई ः भाषा संवंर्धन पंधरवडा निमित्त कोकण विभागाचे भाषा संचालनालय, विभागीय आयुक्त कार्यालय, विभागीय माहिती कार्यालय आणि बृहन्मुंबई राज्य कर्मचारी संघटना, कोकण भवन शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनाचे उद्‌घाटन भाषा संचालक विजया डोनीकर यांच्या हस्ते १६ जानेवारी रोजी करण्यात आले.
याप्रसंगी कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, मुंबई आणि कोकण विभागीय सहाय्यक भाषा संचालक योगेश शेट्ये, कोकण विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, तहसिलदार प्रितीलता कौरथी माने तसेच कोकण भवनातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त होण्यासाठी, मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी आणि भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्थांना या कालावधीत विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याविषयी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी आणि कथाकथन, माहितीपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, राज्यातील विविध महाविद्यालये, सामाजिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी संस्कृती मंडळ तथा राज्य मराठी विकास संस्था यांनी राज्यातील पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, मुंबई आणि कोकणातील रत्नागिरी याठिकाणी असलेल्या साहित्य संस्थांची मदत घ्ोऊन मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यशस्वी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोशल मिडीयावर देखील चळवळ सुरु झाली आहे. पंधरवडा साजरा करताना समाज माध्यमे, वृत्तपत्रे आणि वाहिन्यांद्वारे प्रसिध्दी करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात सांगण्यात येणार आहेत.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कोकण भवनात मांडण्यात आलेले पुस्तक प्रदर्शन याच उपक्रमाचा भाग असून सदर प्रदर्शन २८ जानेवारी २०२३ पर्यंत राहणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी असणार आहे.

भाषा संचालनालय मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या विविध प्रकाशनांचा समावेश या पुस्तक प्रदर्शनात करण्यात आला आहे. कोकण भवनात येणारे नागरिक आणि विशेषतः कोकण भवनातील अधिकारी-कर्मचारी यांनी सदर पुस्तक प्रदर्शनास आवजून भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य भाषा संचालक विजया डोनीकर यांनी यावेळी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रकल्पग्रस्तांना आणि भूमिपुत्रांना डावलुन भरती केल्याने भूमिपुत्र नाराज