खरे लाभार्थी भूमिपुत्र गैर हजर याचीच खंत - अतुल पाटील
नेरूळ येथे भव्य भूमिपुत्र मेळाव्याचे आयोजन
नवी मुंबई -:शासनाने येथील जमीन संपादित केल्या नंतर येथील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी दि बा पाटील यांनी लढा दिला.आणि.त्यानंतर येथील भूमिपुत्रांना मोबदला मिळाला आणि ते लाभार्थी झाले. मात्र याच महापुरुषाच्या जयंती निमित्त आयोजित मेळाव्याला खरे लाभार्थी भूमिपुत्र गैर हजर राहिले याची खंत वाटते. त्यामुळे येथील भूमिपुत्रांना अजून दि बा समजलेलेच नाही असे भावनिक मत लोकनेते दि बा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांनी नेरूळ येथे व्यक्त केले.
स्वर्गीय दि बा पाटील यांच्या ९७ व्या जयंतीचे औचित्य साधत आगरी कोळी युथ फाऊंडेशन व भूमिपुत्र ग्रुप यांच्या माध्यमातून येथील गणपत शेठ तांडेल मैदानात भव्य भूमिपुत्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निमंत्रित मान्यवरांनी मेळाव्यास गैरहजेरी लावल्याने आपल्या अध्यक्षीय भाषणात अतुल पाटील यांनी वरील खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी सांगितले की नवीन शहर वसवण्यासाठी येथील ९५ गावाची जमीन संपादित केल्यानंतर ही गावे देखील कोयना धरण ग्रस्त प्रमाणे उठवणार होती. मात्र त्यास दि बा पाटील यांनी विरोध केला. तर जमीनीच्या बदल्यात जमीन यासाठी दि बांनी रक्तरंजित आंदोलन केले आणि यात पाच हुतात्मे धारातीर्थी पडले आणि त्या नंतर साडेबारा टक्के योजनेचा जन्म झाला आणि इथला भूमिपुत्र तरला. तसेच स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदा करण्यास दिबांनी भाग पाडले. मात्र नव्या पिढीला अजून दिबा समजणे गरजेचे आहे आणि त्यासाठी असले मेळावे भरवले पाहिजे आणि त्यास मी आवर्जून हजर असेन असे आश्वासन अतुल पाटील यांनी आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील आणि आयोजकांना दिले. तसेच आयोजनाचे कौतुक करून संपूर्ण टीमला त्यांनी प्रोत्साहित केले .यावेळी खारी कळवा शेतकरी संघटना,हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे,पैलवान राजू चौधरी यांना पहिला दि बा सन्मान देऊन गौरविण्यात आले.