भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महापालिका तर्फे ‘मराठी'चा जागर
नवी मुंबई ः राजभाषा मराठीचे संवर्धन व्हावे आणि तिचा जास्तीत जास्त वापर व्हावा यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही मराठी भाषेचा गौरव वाढवित मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करणारे तसेच कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर व्हावा यादृष्टीने महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुप्रसिध्द कवी अशोक नायगावकर यांचे मायबोली मराठी या विषयावर व्याख्यान आणि त्यांच्या प्रसिध्द कवितांचे सादरीकरण होणार आहे. १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भाषा अभ्यासक वैभव चाळके शुध्दलेखनाच्या दिशेने % या विषयांतर्गत शुध्दलेखनाचे शासकीय नियम आणि लेखन या विषयावर अधिकारी, कर्मचारी यांच्याशी सुसंवाद साधणार आहेत.
२० जानेवारी रोजी सायं. ४ वाजता कविता डॉट कॉम अशी नवी मुंबईतील कवींची जिंदादील काव्यमैफल संपन्न होणार असून त्यामध्ये कवी प्रा. रविंद्र पाटील, जितेंद्र लाड, वैभव वऱ्हाडी, शंकर गोपाळे, नारायण लांडगे पाटील, रुद्राक्ष पातारे आणि डॉ. कैलास गायकवाड सहभागी होणार आहेत.
२४ जानेवारी रोजी सायं. ४ वाजता सुप्रसिध्द साहित्यिक, कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम जीए-स्मरणखुणा आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये प्रा. वृषाली मगदूम, डॉ. मृण्मयी भजक आणि मिनाक्षी पाटील या जीएंच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. तसेच त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये कथन करीत काही कथांचे अभिवाचन करणार आहेत.
२७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महापालिकाअधिकारी-कर्मचारीवृंदांची स्वकाव्यवाचन स्पर्धा होणार असून या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना स्वतःची एकच स्वरचित कविता सादर करता येईल. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेचच या स्पर्धेचा तसेच निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारभ संपन्न होणार आहे.
याशिवाय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्याकरिता निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता पर्यावरण संवर्धन-माझी संकल्पना किंवा जागर अभिजात मराठीचा यापैकी एका विषयावर कमाल २००० शब्द मर्यादेत आपले निबंध कागदाच्या एका बाजुला लिहून (पाठपोट नाही) सादर करावयाचे आहेत. अधिकारी-कर्मचारी यांनी आपले निबंध २० जानेवारी २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रशासन विभागाचे अधीक्षक अरविंद उरसळ (८३६९६४७४५५) यांच्याकडे जमा करावयाचे आहेत.
तसेच काव्य स्पर्धेकरिता आपली नाव नोंदणी २४ जानेवारी पर्यंत विधी अधिकारी अभय जाधव (७६७८००४५०२), अधीक्षक-प्रशासन अरविंद उरसळ (८३६९६४७४५५), अधीक्षक-आपत्ती व्यवस्थापन रवी जाधव (९९२०३७८५७४) यांच्याकडे करणे आवश्यक आहे.
नवी मुंबई सांस्कृतिक शहर म्हणून नावारुपाला येत असताना महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्येही सांस्कृतिकतेची जोपसना व्हावी आणि यातून मराठी भाषेचा दैनंदिन कामकाजात वापर वाढून गौरव व्हावा यादृष्टीने नवी मुंबई महापालिका अतिशय उत्साहाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करीत आहे.