‘सिडको'तील ४७५ कर्मचाऱ्यांची आरोग्य, नेत्र तपासणी
नवी मुंबई ः सिडको एम्प्लॉईज युनियन आणि प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांची ९७ वी जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी ‘सिडको'चे सहव्यवस्थापकीय संचालक-१ राजेश पाटील, पोलीस उपायुवत तथा मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, ‘सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष जे. टी. पाटील, ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष विनोद पाटील यांच्यासह ‘सिडको'तील इतर ‘असोसिएशन'चे पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ‘सिडको भवन'मध्ये ‘दिबां'च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील उपहारगृहाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मागील सुमारे दोन वर्षांपासून बंद असलेले उपहारगृह ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'च्या पाठपुराव्यानंतर पुन्हा सुरु करण्यात आले. दिवंगत दि. बा. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत, तसेच त्यांच्या संपादित जमिनीचा त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. ‘दिबां'च्या या संघर्षमय लढाईचे स्मरण म्हणून ‘सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'कडून दरवर्षी ‘दिबां'च्या जयंतीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष जे. टी. पाटील यांनी दिली.
यावेळी एमजीएम रुग्णालय-वाशी आणि सानपाडा येथील सेंटर फॉर साईट (नेत्र हॉस्पिटल) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचा सुमारे ४७५ कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी, अस्थिरोग, दंतचिकित्सा आदि तपासण्या, महिला कर्मचाऱ्यांंसाठी पॅप चाचणी तसेच स्त्रीरोग तज्ञांचे मार्गदर्शन आणि नेत्र तपासणी मध्ये मोतिबिंदू तपासणी, व्हिजन चेक, रंगआंधळेपणा, काचबिंदू आशंका, कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम आदि तपासणी करण्यात आली.
सदर शिबीरावेळी ‘सिडको'चे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी उपस्थित राहून फिटनेस संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी ‘सिडको'चे व्यवस्थापक फैयाज खान, आरोग्य अधिकारी डॉ. बावस्कर, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.