पहिल्या टर्शरी ट्रीटमेंट प्लांट मधील प्रक्रियाकृत सांडपाण्याचा उद्यानांना वापर करण्यास प्रारंभ

प्रक्रियाकृत सांडपाणी उद्यानांना वापरल्याने प्रतिदिन महापालिकेच्या २ दश लक्ष लिटर पाण्याची बचत

तुर्भे - नवी मुंबई महापालिकेने स्व-खर्चातून उभारलेल्या पहिल्या टर्शरी ट्रीटमेंट प्लांट मधील प्रक्रियाकृत सांडपाण्याचा उद्यानांना वापर करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याची प्रतिदिन २ दश लक्ष लिटर  बचत होत आहे. म्हणजेच महापालिकेचे मागील ४ महिन्यात  ११ लाख ५० हजार रुपये वाचवण्याचे काम सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने केले आहे. 

२००० साली नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सी-टेक आधुनिक प्रणालीचा वापर करून सीव्हरेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी ) ७ ठिकाणी बांधण्यात आले होते. एसटीपीच्या माध्यमातून शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे शुद्ध पाणी खाडीमध्ये सोडण्यात येते. एसटीपीचा पुढील टप्पा म्हणजेच टर्शरी ट्रीटमेंट प्लांट (टीटीपी) आहे.  महापालिकेच्या वतीने २०२१ मध्ये टर्शरी ट्रीटमेंट प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नेरुळ सेक्टर - ५० येथील एसटीपी लगत ५ दश लक्ष लिटर क्षमतेचा प्लांट उभारला. तसेच या प्लांट मधून पहिल्या टप्प्यात नेरूळ फेज १ मधील ३० उद्यानांना पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या टाकण्यात आल्या. या प्रकल्पासाठी १३ कोटी १३ लाख रुपये खर्च करण्यात आला. सप्टेंबर २०२२ पासून या प्लांट मधून प्रतिदिन २ दश लक्ष लिटर इतके पाणी ३० उद्यानांना दिले जाते. यापूर्वी या उद्यानांना पिण्याचे पाणी वापरले जात होते. सध्या पिण्याचे पाण्याचे घरगुती दर १ हजार लिटरला ४ रुपये ७५ पैसे आहे. तर वाणिज्य वापराचा दर २२ रुपये ५० पैसे आहे.  प्रतिदिन २ दश लक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची बचत होत असल्याने महापालिकेचे अप्रत्यक्षपणे ४ महिन्यात ११ लाख रुपयांची बचत झाली आहे. इतकेच नव्हे, तर पिण्याचे पाणी मोरबे धरणातून प्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करणे आणि तेथून पुढे ते नवी मुंबईत आणणे यासाठी जो अप्रत्यक्ष खर्च होणार होता, त्या खर्चातही बचत झाली आहे. आता पुढील टप्यात याच प्लांट मधील उर्वरित पाणी नेरुळ फेज २ मधील १७ उद्याने, पामबीच वरील किल्ला जंक्शन सिग्नल ते मोराज सिग्नल पर्यंतचा दुभाजक, नेरुळ फेज १ व २ मधील सर्व दुभाजक या ठिकाणच्या झाडांना पुरवण्यात येणार आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई पोलीस दलातील २०४ पोलीस शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया सुरु ; तब्बल १२ हजार ३७५ उमेदवारांचे अर्ज