१३ जानेवारी २०२३ रोजी महापालिकेने दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करण्याची आयुक्तांकडे मागणी
महापालिकेने दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करण्याची मागणी
नवी मुंबई ः १३ जानेवारी २०२३ रोजी नवी मुंबई महापालिकेने प्रकल्पग्रस्तांचे अर्ध्वयू लोकनेते दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करण्याची मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका अनेक युगपुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करुन त्यांच्या कार्याला उजाळा देतानाच नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे. महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे ठराव दोन्ही सभागृहात मंजूर केलेले आहेत. नवी मुंबई महापालिका भूमीपुत्रांनी त्याग केलेल्या जमिनीवर स्थापित झाली आहे. लोकनेते दि. बा. पाटील भूमीपुत्रांचे आराध्य दैवत असून भूमीपुत्रांचे पुनर्वसन आणि पुनर्विकास याबाबत अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे सर्व भूमीपुत्र संघटीत आहेत म्हणूनच विविध हक्कांसाठीच्या संघर्ष करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्यामुळे प्रकल्पग्रस्तांना कायमच ऊर्जा प्राप्त होत असते, असे दशरथ भगत यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या मागणी पत्रात नमूद केले आहे.
याशिवाय लोकनेते दि. बा. पाटील देशातील शेतकऱ्यांचे नेते होते. त्यांनी कूळ कायद्यासाठी संघर्ष केला, शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत अजरामर असे लढे दिले. राज्याचा प्रश्न म्हणून संयुक्त महाराष्ट्र लढ्यात समर्पित आणि बेळगाव सीमा प्रश्नी एक वर्षे कारावास, स्त्री भ्रूण हत्याबाबत जनजागृती, विविध प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनींच्या बदल्यात परत विकसीत जमीन मिळवून देण्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कायदा केला, अंधश्रध्दा निमर्ुलनासह शैक्षणिक क्षेत्रासाठी देखील दिबांनी भरीव कार्य केलेले आहे, अशी अनेक महान कार्ये दि. बा. पाटील यांनी देश, राज्य आणि जिल्हास्तरावर केलेली आहेत. लोकशाहीतील घटनात्मक अशा खासदार, आमदार, राज्याच्या विधानमंडळाचे विरोधी पक्षनेते या पदांवर त्यांनी समर्पित कार्य केलेले आहे.
त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या कार्याचे स्मरण होण्यासाठी आणि त्यांच्या अतुल्य कार्यांपासून अनेक वंचित, बाधित आणि उपेक्षित कष्टकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच राज्यात आणि देशात सुरु असलेल्या अथवा होणाऱ्या आंदोलनातील आंदोलकांना अखंड ऊर्जा प्राप्तीसाठी प्रेरणा म्हणून महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रतिवर्षी १३ जानेवारी रोजी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात यावे, अशी मागणी दशरथ भगत यांनी केली आहे.