कोणतीही सूचना न देता नो-पार्कीग मधील वाहनांचे फोटो काढुन त्यांच्यावर कारवाई
तुर्भे वाहतुक पोलिसांकडुन पार्किंग मधील वाहनांवर कारवाई? नागरिकांमधुन नाराजी
नवी मुंबई : सानपाडा-जुईनगर भागातील मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्किंग होत असलेल्या अवजड वाहने, कंटेनर, खाजगी बसेस आणि इतर लहान-मोठी वाहनांवर कारवाई करण्याऐवजी तुर्भे वाहतूक शाखेतील कार्यक्षम अधिकारी-कर्मचारी फक्त नागरिकांची तक्रार, हे कारण पुढे करुन सानपाडा येथील डी-मार्ट लगत रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या दुचाकींवर कारवाई करुन त्यांना ऑनलाईन दंड भरण्यासाठी ई-चलान पाठवित असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे डेड-एन्ड असलेल्या येथील रस्त्यावरुन फक्त डी-मार्टच्या दिशेने येणारी वाहनेच जाऊ शकत असताना, वाहतुक पोलिसांकडुन येथील दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जुईनगर रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या डी-मार्टमध्ये अनेक नागरिक आपली वाहने घेऊन येत असतात. डी-मार्ट शेजारीच डेडएन्ड रस्ता असुन या रस्त्यावरुन फक्त डी-मार्टच्या दिशेने येणारी वाहनेच जाऊ शकतात. त्यामुळे डी- मार्ट अथवा त्या परिसरात येणारे नागरिक आपली वाहने विशेषत दुचाकी पार्क करण्यासाठी सदर डेड-एन्ड रस्त्याचा वापर करतात. विशेष म्हणजे या रस्त्यावरील वाहनांचा कोणत्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा होत नाही. असे असताना, वाहतुक पोलिसांकडुन वाहतुकीला अडथळा न ठरणाऱया येथील डेड एन्ड रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सानपाडा भागात राहणाऱया काही नागरिकांना वाहतुक पोलिसांकडुन ई-चलान पाठविण्यात आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला आहे.
तर दुसरीकडे येथील डेड-एन्ड रस्त्याच्या समांतर असलेल्या सानपाडा ते जुईनगर रेल्वे स्थानक दरम्यानच्या रस्त्यावर दोन्ही मार्गिकांवर मोठ-मोठे कंटेनर, अवजड वाहने, रसायन वाहून नेणारे टँकर, खाजगी बसेस दिवस-रात्र पार्क केलेल्या असतात. याच मुख्य रस्त्यावर लहान-मोठी अपघाताच्या घटनाही नियमित घडत असतात. तसेच नवी मुंबई महापालिकेच्या सफाई कामगाराच्या दुचाकीला कंटेनरची धडक बसून एका सफाई कामगाराचा मृत्यू देखील याच मार्गावर झाला आहे. असे असताना देखील तुर्भे वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या वाहनांवर कारवाई करण्याऐवजी त्या वाहनांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांकडुन करण्यात येत आहे. नागरिकांकडुन वारंवार तक्रार आणि निवेदन देऊनही लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणारे तुर्भे वाहतुक शाखेतील वाहतूक पोलीस कोणत्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा न ठरणा-या वाहनांवर कारवाई करुन नागरिकांना ऑनलाईन दंड भरण्यासाठी ई-चलान पाठवित आहेत. वाहतुक पोलिसांच्या अशा या उरफाटा कारभाराबाबत नागरिकांमधुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.