वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाची काही प्रमाणात दुरावस्था झाल्याने शिवप्रेमीकडून संताप व्यक्त
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाची दुरावस्था
वाशी - वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाची काही प्रमाणात दुरावस्था झाल्याने शिवप्रेमीकडून संताप व्यक्त केला जात आहे. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नवी मुंबईतील महत्वाचे ठिकाण आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून या चौकाचे सुशोभीकरण केले आहे. या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच वाशी डेपो लगत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राची माहितीपर शिल्प साकारण्यात आली आहेत. याच ठिकाणी ६ डोम असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध ६ छायाचित्रांचे फ्लेक्स लावण्यात आले होते. सध्या त्यातील ४ फ्लेक्स उरले असून उन्हामुळे त्या फ्लेक्सचा रंग फिक्कट झाला आहे. तसेच संपूर्ण चौकावर विद्युत विभागाने आकर्षक रोषणाई केली होती. ती आता बंद असून लाईटीचा रनींग पट्टा, हॅलोजन तुटून ठिकठिकाणी लोंबकळत आहे. या शिल्पांना कोणी हात लावू ते खराब होऊ नये यासाठी शिल्पा समोर २ फूट जागा सोडून संरक्षक काच लावली आहे.
या २ फुटाच्या जागेत अडगळीचे सामान ठेवण्यात आले आहे. तसेच शिल्पांच्या चौकटीना उधई (किड) लागली आहे. समोरील काचेवर प्रचंड धूळ असते. याच ठिकाणच्या रॅम्पवर गवत उगवलेले असते; मात्र सफाई कामगारांकडून त्याची वेळीच दखल घेतली जात नाही. अश्वारूढ पुतळ्याच्या चौथऱ्यावर गवत उगवले आहे. चौथऱ्याच्या पाया समोरील पेव्हर ब्लॉक खराब झाले असून येथे कचरा पडलेला असतो. येथील शिल्प आणि अश्वारूढ पुतळा यांच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत; मात्र चौकाच्या परिसरात भटकी कुत्रे झोपले,तरी सुरक्षा रक्षक त्यांना हटकताना दिसत नाही. अनेकदा ते मोबाईल मध्ये गुंग असतात. याच चौकात एमटीएनएल जवळील प्रदर्शन कट्टा असून त्याचीही अशीच परिस्थिती आहे. येथील स्टीलचे रेलिंग तुटले आहे. या ठिकाणी अनेकदा राजकीय आणि सामाजिक उपक्रम झाल्यावर त्यांच्याकडून या परिसरात कचरा करणे, पाण्याच्या मोकळ्या बाटल्या टाकणे यासह अन्य प्रकारचे बेशिस्तपणाचे दर्शन घडते. यालाही चाप लागणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे नवी मुंबईचे प्रमुख भरत माळी यांनी व्यक्त केली.