कार्यान्वित टर्शरी ट्रीटमेंट प्लांट द्वारे ६ एमएलडी पुनर्प्रक्रियाकृत पाणीपुरवठा
टीटीपी प्रकल्प सुरु करणारी नवी मुंबई देशातील पहिली महापालिका
नवी मुंबई ः सन २००० साली नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सी-टेक आधुनिक प्रणालीचा वापर करुन सीवेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) आठ ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. ‘एसटीपी'च्या माध्यमातून शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन सदर शुद्ध पाणी खाडीमध्ये सोडण्यात येते. ‘एसटीपी'चा पुढील टप्पा म्हणजेच टर्शरी ट्रीटमेंट प्लांट (टीटीपी) महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे आणि ऐरोली येथे कार्यान्वितत करण्यात आले आहेत. या प्लांटमधून महापे येथील कारखान्यांना ५ एमएलडी पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. महापालिकेच्या घणसोली पामबीच मार्गावरील बगीचांसाठी १ एमएलडी पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर होत आहे. या टीटीपी केंद्रामध्ये ‘एसटीपी'कडून आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करुन पाणी शुद्ध केले जाते. नवी मुंबईमध्ये टीटीपी प्रकल्प सुरु करण्यासाठी महापालिका सर्वसाधारण सभेने ठराव केला होता. त्याचबरोबर माजी आमदार संदीप नाईक यांनी २०१६ मध्ये राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सदर केंद्रे नवी मुंबईत स्थापन करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने आ.गणेश नाईक यांनी कार्यान्वित झालेल्या दोन्ही टीटीपी केंद्रांची पाहणी केली.
याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहराच्या भविष्यकालीन गरजांचा वेध घ्ोऊन या गरजांची पूर्तता करण्यासाठी विविध विकास प्रकल्प शहरामध्ये निर्माण केले आहेत. माजी महापौर संजीव नाईक यांच्या कार्यकाळात २००० साली आधुनिक सीटेक तंत्रज्ञानाची एसटीपी केंद्रे उभी राहिली. या एसटीपी केंद्रांमधून निर्माण होणारे प्रक्रियाकृत पाणी एनआरआय गृहसंकुल, शहरातील बाग-बगीचे यांच्यासाठी वापरण्यात येते. नवी मुंबई शहराची पुढील तीस वर्षांची अपेक्षित लोकसंख्या वाढ विचारात घ्ोऊन तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी केंद्रे सक्षम आहेत. यानंतर आता केंद्र सरकारच्या अमृत मिशन योजना अंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई शहरात प्रत्येकी २० एमएलडी क्षमतेचे दोन टीटीपी प्रकल्प ऐरोली आणि कोपरखैरणे येथे उभे राहिले आहेत. सदर टीटीपी केंद्रांमधून प्रक्रिया केलेले ५ एमएलडी पाणी उद्योगधंद्यांना पुरवण्यास सुरुवात झाली असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.
कारखान्यांना बॉयलर, प्रिंटींग, डाईंग, बांधकाम, बाग-बगीचे यासाठी सदर पाणी विकण्यात येते आहे. माजी आमदार संदीप नाईक यांनी उद्योगधंद्यांना एसटीपी प्लांटमधून पुनर्प्रक्रियाकृत पाणी वापरण्यासंबंधीचा विषय २०१६ मध्ये विधानसभा अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता. ‘एमआयडीसी'मध्ये मागणीच्या तुलनेत होणारा अपुरा पाणीपुरवठा पाहता पुनर्प्रक्रियाकृत पुरवठा करण्यासंबंधीचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घ्यावा. या अनुषंगाने जलवाहिन्या टाकण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी देखील
केली होती. टर्शरी ट्रीटमेंट प्लांट सीवरेज ट्रीटमेंट प्लांटस्चे आधुनिक रुप आहे. अल्ट्रा फिल्टरेशन आणि अल्ट्राव्हायोलेट पध्दतीने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. टीटीपी प्लांटमधून पुनर्प्रक्रियाकृत पाणी विकून महापालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे. टीटीपी प्लांटमधील पाणी विकून महापालिकेला पुढील १५ वर्षात ४९४ कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. टीटीपी मधून पाणी विकत घ्ोतल्याने उद्योगांची पैशाची बचत होणार आहे.
सध्या एमआयडीसी उद्योगांना २२.५० प्रति क्युबिक मीटरने पाणी विकते. नवी मुंबई महापालिका उद्योगांना टीटीपी मधील पुनर्प्रक्रिया केलेले पाणी मात्र १८.५० प्रति क्युबिक मीटरने विकणार आहे. म्हणजेच उद्योगधंद्यांची प्रति क्युबिक मीटर चार रुपयांच्या पैशांची बचत होणार आहे. एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात दर दिवशी ५० एमएलडी पाणीपुरवठा करत आहे. एकीकडे उद्योगधंद्यांची पैशाची बचत होणार आहे, तर दुसरीकडे पुनर्प्रक्रियाकृतपणे वापरले जाणार असल्याने उद्योगांना ‘एमआयडीसी'कडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची देखील बचत होणार आहे. त्यामुळे वाचलेले सदर पाणी ‘एमआयडीसी'ला निवासी भागात पुरवठा करता येईल.