नवी मुंबई पहिली महापालिका औद्योगिक वसाहतीत महिनाभरात पाणी पुरवठा
महापालिका तर्फे पुर्नप्रक्रियाकृत पाणी विक्री
वाशी ः स्वतःच्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. आता पुर्न प्रक्रियाकृत पाणी विकून त्यापासून उत्पन्न मिळवणारी पहिली महापालिका असा बहुमान देखील नवी मुंबई महापालिकेला मिळणार असल्याने महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. येत्या महिनाभरात नवी मुंबई महापालिका पुर्नप्रक्रियाकृत पाणी औद्योगिक क्षेत्रात पूर्ण क्षमतेने पुरवठा करणार आहे.
राज्य शासनाच्या ३० नोव्हेबर २०१७ रोजीच्या निर्णयानुसार एमआयडीसी परिक्षेत्रातील उद्योगांना त्यांच्या सभोवतालच्या ५० किलोमीटर परिघातील उपलब्ध प्रक्रियायुक्त सांडपाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे केद्र शासनाच्या अमृत योजना अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने कोपरखैरणे आणि ऐरोली येथे २०-२० दशलक्ष लिटर क्षमतेचे दोन प्रकल्प बांधले आहेत.
नवी मुंबई मध्ये सी-टेक या अत्याधुनिक तंत्रप्रणालीवर आधारित ७ मलप्रकिया केंद्र आहेत. त्यातील पाणी रस्त्याच्या दुभाजकांतील उद्यानासाठी वापरले जाते. या अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रातील सेकंडरी ट्रिटमेंट होऊन बाहेर पडणाऱ्या प्रक्रियाकृत सांडपाण्यावर अल्ट्रा फिल्टरेशन आणि अल्ट्रा व्हायलेट या प्रगत तंत्रज्ञानाव्दारे प्रक्रिया करुन टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांटमध्ये उद्योगसमुहांना उपयोगात आणता येईल, अशा मानकाचे पुर्नप्रक्रियाकृत पाणी तयार केले जात आहे. लवकरच या पाण्याचा औद्योगिक वसाहतीत पुरवठा होणार आहे. त्यासाठी एमआयडीसी मध्ये तीन ठिकाणी उच्चस्तरीय जलकुंभ उभारण्यात आले आहेत. तसेच ८६ किलोमीटर अंतराच्या जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले आहे. आता ठाणे-बेलापूर मार्गावर पावणे, कोपरखैरणे आणि रबाळे येथे पूर्व आणि पश्चिम बाजूला या जलवाहिनी जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या महिनाभरात सदर काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर संपूर्ण औद्योगिक वसाहतीत पुर्नप्रक्रियाकृत पाण्याचा पूर्ण क्षमतेने पुरवठा होईल, अशी माहिती नवी मुंबई महापालिका शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.
नवी मुंबई महापालिकाने कोपरखैरणे आणि ऐरोली येथे २०-२० दशलक्ष लिटर क्षमतेचे दोन प्रकल्प बांधले आहेत. यातील कोपरखैरणे केंद्रातून तयार होणारे ६ लाख लिटर पाणी तुर्भे एमआयडीसी मधील ६ उद्योगसमुहांना प्रायोगिक स्वरुपात पुरविले जात आहे.
४९४.५३ कोटींचा महसूल
नवी मुंबई महापालिका पुर्नप्रक्रियाकृत पाणी उद्योगसमुहांना १८ रुपये ५० पैसे प्रति घनमीटर दराने विक्री करणार असून महापालिकेला १५ वर्षांत या पाणी विक्रीतून ४९४.५३ कोटींचा महसूल मिळणार आहे. त्यामुळे पुर्नप्रक्रियाकृत पाण्यापासून महसूल मिळवणारी नवी मुंबई महापालिका पहिली महापालिका असणार आहे.