सानपाडा येथे दुचाकी पार्किंगमुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास

फुटपाथ उरले फक्त नावालाच ; दुचाकी पार्किंगमुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास

जुईनगर : सानपाडा विभागातील ठिकठिकाणी फुटपाथवर अनधिकृतपणे मोटारसायकल उभ्या केल्या जात असल्यामुळे फुटपाथवरून ये-जा करणार्‍या पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सानपाडा विभागातील सेक्टर 5, सेक्टर 7, सेक्टर 10 अशा विविध प्रभागांमध्ये फुटपाथवर दुचाकी वाहने पार्किंग केलेली पाहायला मिळतात. या विभागातून जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. सानपाडा विभागातील सेक्टर 7 मध्ये अनेक दुचाकीस्वारांनी आपल्या दुचाकी फुटपाथवर पार्किंग केल्यामुळे ह्या फुटपाथवरून जाणाऱ्या येणाऱ्या महिला, लहान मुले, जेष्ठ व्यक्ती, कॉलेज साठी जाणारी तरुण मुलेमुली यांना अडथळा निर्माण होत आहे. जवळच स्वामी विवेकानंद स्कूल, न्यु मेलेनियम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एम पी सी टी हॉस्पिटल  असल्यामुळे ह्या रस्त्याने नेहमीच शाळेत जाणाऱ्या मुलांची, आणि हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे इथे अनेक वेळा अपघात झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.त्यामुळे  फुटपाथवर अनधिकृतपणे वाहने पार्किंग करणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तसेच अनेक वेळा नो पार्किंगमधील वाहने उचलणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या टीमचे देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पदपथावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनी केला आहे.

सानपाडा विभागामधील फुटपाथ  हे नागरिकांना चालण्यासाठी बनवले आहे का दुचाकी वाहने पार्किंगसाठी बनवले आहेत,असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह पादचाऱ्यांना पडू  लागला आहे. फुटपाथवर वाहनांची वेडीवाकडी पार्किंग केल्यामुळे अनेक नागरिकांना अडथळे चुकवत रस्त्यावरून चालण्याची वेळ येते. परंतु यामुळे पादचारी नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी ठेवण्यात आलेल्या फुटपाथवर पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकींवर कारवाई करून फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळा करण्यात यावा अशी मागणी जेष्ठ नागरिकांनी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई पहिली महापालिका औद्योगिक वसाहतीत महिनाभरात पाणी पुरवठा