पत्रकार दिनानिमित्त ‘दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन

नवी मुंबई महापालिका मध्ये पत्रकार दिन साजरा

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात पत्रकार दिनानिमित्त ‘दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिवत आयुवत सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, जनसंपर्क अधिकारी महेंद्र काेंडे तसेच विविध वृत्तपत्र आणि वृत्तचित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवी मुंबईच्या यशात आणि प्रगतीत येथील पत्रकारांचा अत्यंत महत्वाचा वाटा असून नवी मुंबई महापालिकेच्या चांगल्या कामांना पत्रकारांनी दिलेल्या व्यापक प्रसिध्दीमुळे येथील विकासकामे सर्वदूर पोहोचली आणि चांगल्या कामांना गती लाभली सांगत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी ‘दर्पण”कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले.

‘आपले राज्य कसे गेले आणि इंग्रजांचे राज्य कसे आले, याचे अचूक निदान करणारे पत्रकार' अशा शब्दात आचार्य अत्रे यांनी गौरविलेले आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या विसाव्या वर्षी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण' वृत्तपत्र सुरु करुन मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक असणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांनी सुधारकी विचारांच्या समाज निर्मितीसाठी सामाजिक असमानता, बालविवाह, सतीप्रथा, केशवपन, अंधश्रध्दा यावर प्रहार करीत दर्पण चालविले. त्याचप्रमाणे तत्कालीन ब्रिटीश सत्तेविरुध्द स्वातंत्र्यासाठी लोकमानस तयार केले.

न्या. चंदावरकर यांच्यासारख्या विद्वानांनी ‘पश्चिम भारतातील आदय ऋषी' असा त्यांचा सन्मान केला. एलफिस्टन कॉलेज मध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असताना स्वातंत्र्यसेनानी दादाभाई नवरोजी त्यांचे विद्यार्थी होते. दादाभाईंनी त्यांना ‘अद्वितीय विद्वान' असे म्हटले आहे. अशा क्रांतीकारी विचारांचे देशभक्त, आद्य पत्रकार म्हणून गौरविण्यात आलेले पहिले मराठी वृत्तपत्रकार, पहिले इतिहास संशोधक, लोकशिक्षणाचे आद्य प्रवर्तक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करीत त्यांच्या स्मृतींना नवी मुंबई महापालिका प्रशासन तसेच सर्व पत्रकारांच्या वतीने यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिबांच्या जयंतीनिमित्त नेरूळ मधील गणपत शेठ तांडेल मैदानात भव्य मेळाव्याचे आयोजन