कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

कोकण विभाग विधान परिषदच्या शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर

ठाणे ः भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग विधान परिषदच्या शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर केली असून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर  पालन होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शिनगारे यांनी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी निवडणूक कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार ठोंबरे, विलास जोशी, शिरीष घरत, नैनेश पाटणकर, संभाजी शेळके, आदि राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. या मतदारसंघासाठी जिल्ह्यात २० मतदान केंद्रे असणार आहेत. तसेच जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीत जिल्हाधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष, माध्यम प्रमाणीकरण-देखरेख समिती आणि भरारी पथक स्थापन करण्यात येत आहेत. तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात येत असून, या पथकांमार्फत राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत पर्यवेक्षण करण्यात येईल. विभागीयस्तरावर २४ तास चालू असलेला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात १४,६८३ मतदार...
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ठाणे जिल्ह्यात एकूण १४ हजार ६८३ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. यामध्ये ८७६७ स्त्री मतदार असून ५९१६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर अंतिम मतदार यादीनुसार कोकण विभागात एकूण ३७ हजार ७१९ मतदार आहेत.

मतदार शिक्षकांना नैमित्तिक रजा...
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष नैमित्तिक रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नावे असलेल्या शिक्षकांना नैमित्तिक रजा अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक